आगामी तेलुगू चित्रपट George Reddy शी जुळलीय मराठीची ‘ नाळ’

1620

तेलुगू चित्रपट निर्मात्यांनी विद्यार्थी नेता असलेल्या जॉर्ज रेड्डी याच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची निर्मिती केली आहे. कडवट डाव्या विचारसरणीच्या असलेल्या जॉर्ज रेड्डी याचा महाविद्यालयीन निवडणुकीच्या वादातून खून करण्यात आला होता. या घटनेला 47 वर्ष होऊन गेली असून हा सगळा संघर्ष मोठ्या पडद्यावर आणण्याचं दिग्दर्शक जीवन रेड्डी यांनी ठरवलं होतं. याच जीवन रेड्डी यांनी नक्षलवाद्यांवर दलम हा चित्रपट बनवला होता.

या चित्रपटाबाबत बोलताना जीवन रेड्डी यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या एका गटाचा प्रखर विरोध होईल याची भीती वाटल्याने त्यांनी चित्रपटाचा बराचसा भाग हा खऱ्या जागांवर चित्रीत न करता सेट उभा करून चित्रीत केला आहे. एप्रिल 1972 साली जॉर्ज यांचा खून करण्यात आला होता. तेव्हा जीवन रेड्डी यांचा जन्मही झाला नव्हता. आपण मोठे होत असताना जॉर्ज यांच्या बऱ्याच कथा ऐकल्या होत्या, आणि त्यांच्या जीवनावर चित्रपट निघावा असं वाटत असल्याने आपण हा विषय निवडल्याचं जीवन यांनी सांगितले आहे.

जॉरज रेड्डी यांना त्यांच्या समर्थकांनी ‘आंध्र प्रदेशचा चे गव्हेरा’ असं नाव दिलं होतं. जॉर्ज यांना जवळून पाहणाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की त्यांच्या क्रांतीकारक विचारांमुळे देशभरात विद्रोहाची आग पसरली होती. संदीप कुमार हा जॉर्ज रेड्डी यांची भूमिका साकारत आहे. त्याने जॉर्ज यांच्यासारखे दिसण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचे ट्रेलरवरून जाणवतं आहे.

जॉर्ज रेड्डी उस्मिनाया विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र विषयात संशोधन करणारा विद्यार्थी होता. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या जॉर्ज यांनी शिक्षणात विज्यापीठाचे सुवर्णपदक मिळवले होते. याशिवाय त्यांचा लौकीक उत्तम बॉक्सर म्हणूनही होता. रुमालाच्या टोकाला ब्लेड बांधून मारामारीसाठी आलेल्यांना घायाळ करण्याचं तंत्र जॉर्ज यांनी आत्मसात केलं होतं. ते आत्मसात करण्यासाठी आपल्यालवा बरीच मेहनत घ्यावी लागली असं अभिनेता संदीप कुमार याने सांगितले आहे.

या चित्रपटाशी मराठी नाळजोडल्याचे बातमीच्या शीर्षकामध्ये म्हटले आहे. त्याचे कारण असे आहे की नाळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर यक्कंटी हे जॉर्ज रेड्डी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. नाळ चित्रपटातीलच अभिनेत्री देविका दफ्तरदार हिने जॉर्ज रेड्डी याच्या आईची भूमिका साकारली आहे. तर नाळ चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने लहानपणीच्या जॉर्ज रेड्डीची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटामध्ये 1962 ते 1972 दरम्यानचा काळ दाखवण्यात आला आहे. हा काळ मोठ्या पडद्यावर उभा करणं हे मोठं आव्हान होतं असं दिग्दर्शकाने सांगितलं आहे.  

 

आपली प्रतिक्रिया द्या