अमेरिकेतील राज्याने केला हिंदूद्वेषाचा निषेध, प्रस्ताव पारीत करणारे जॉर्जिया पहिले राज्य बनले

अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने कट्टर हिंदूद्वेषाचा निषेध केला आहे. इथल्या लोकप्रतिनिधींनी हा निषेध करण्यासाठी एक प्रस्ताव पारीत केला आहे. अशा प्रकारचा निषेध प्रस्ताव पारीत करणारे जॉर्जिया हे अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. हिंदू धर्म हा जगातील सगळ्यात प्राचीन आणि जुना धर्म आहे. 100 हून अधिक देशांमध्ये हिंदू धर्माचे 1.2 अब्ज अनुयायी आहेत. हिंदू धर्म सर्वसमावेशकता, एकमेकांचा सन्मान राखणे आणि शांततेचा पुरस्कार करणारा धर्म असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे.

जॉर्जियातील लोकप्रतिनिधी लॉरेन मॅकडोनाल्ड आणि टॉड जेम्स यांनी हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात म्हटले आहे की विविध क्षेत्रामध्ये अमेरिकेतील हिंदू समाजाने मोठे योगदान दिले आहे. योग, आयुर्वेद, ध्यान, अन्न, संगीत आणि कलेच्या माध्यमातून हिंदूंनी सांस्कृतिक जीवनही समृद्ध केले आहे. अमेरिकेनेही या गोष्टींचा मनापासून स्वीकार केला आहे. असं असताना अमेरिकेतील अनेक भागांमध्ये हिंदूविरोधात द्वेष व्यक्त करत त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू झालं आहे. हिंदू धर्म नष्ट करण्याच्या कट्टरपंथीयांकडून धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत आणि या प्रस्तावाद्वारे त्याचा निषेध करण्यात आला आहे.

अमेरिकेतील हिंदूंना भेडसावणाऱ्या समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचवण्यासाठी तेथील हिंदू संघटनांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये रिपब्लिक आणि डेमोक्रॅट अशा दोन्ही पक्षांचे 25 खासदार हजर होते. हिंदू समाजाला भेडसावणाऱ्या समस्या या लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या.