जर्मनी की बेल्जियम? आज हॉकीच्या वर्ल्ड चॅम्पियनचा फैसला

जगज्जेतेपद राखण्याचा जो पराक्रम पाकिस्तान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाने केलाय त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी रविवारी बेल्जियमला लाभली आहे. गत जगज्जेता बेल्जियमला दोनवेळा जगज्जेता ठरलेल्या जर्मनीचा पराभव करून जगज्जेतेपद राखावे लागणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आणि माजी जगज्जेते असल्यामुळे उद्या काँटे की टक्कर होणार हे निश्चित.

बेल्जियम या वर्ल्ड कपमधला सर्वात प्रौढ आणि अनुभवी संघ आहे. त्यांनी चार वर्षांपूर्वी वर्ल्ड कप तर 2021 ला ऑलिम्पिकचे सुवर्ण जिंकले होते. दुसरीकडे जर्मनी दोनवेळा 0-2 ने पिछाडीवर असताना त्यांनी अंतिम फेरीपर्यंत प्रवास केलाय. त्यांचा संघ सहापैकी पाच सामने जिंकलाय तर एक सामना अनिर्णितावस्थेत सुटला होता. 2006 मध्ये केलेल्या कामगिरीची त्यांनी पुनरावृत्ती करायची आहे. त्यामुळे दोन्ही संघ ताकदीचे आहेत आणि निकाल बदलण्याची क्षमता ठेवणारे संघ आहेत.