जर्मनी मंदीच्या विळख्यात ! युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था संकटात; रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका

युरोपातील सर्वात मोठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश जर्मनी आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर सुरू झालेले रशिया-युव्रेन युद्ध याचा प्रचंड मोठा फटका जर्मनीला बसला. उत्पादन घटले, निर्यात मंदावली असून महागाई, बेरोजगारीत वाढ झाली आहे. दरम्यान, जर्मनीतील मंदीचा परिणाम युरोप, हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांना बसण्याची शक्यता आहे.

कोरोनानंतर जग हळूहळू सावरत असले तरी मंदीचे सावट आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था वर्षभरापासून मंदीच्या छायेत होती. आता सरकारी आकडेवारीनुसार जर्मनीत आर्थिक मंदीचा विळखा बसल्याचे स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी 0.3 टक्क्यांनी घसरला आहे. यापूर्वी 2022च्या चौथ्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी 0.5 टक्क्यांनी घसरला होता. जेव्हा सलग दोन तिमाहीत आर्थिक विकास दर घसरतो तेव्हा मंदी असल्याचे मानले जाते.

पुतीन यांचा गॅस स्ट्राइक

  • जर्मनीचे ऊर्जा क्षेत्र गॅसवर अवलंबून आहे आणि 55 टक्के गॅस रशियाकडून आयात केला जातो.
  • रशियाने युव्रेनवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती बदलली. अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले. जर्मनीही यात सहभागी झाली. याला प्रत्युत्तर देताना राशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी ‘गॅस स्ट्राइक’ केला. जर्मनीला गॅस पुरवठा बंद केला.
  • वर्षभरापासून रशियाचा गॅस पुरवठा बंद झाल्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले. जर्मनीने कतारशी गॅस करार केला, पण कतारचा गॅस मिळण्यास 2026 साल उजाडणार आहे. तोपर्यंत जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

उत्पादन घटले, बेरोजगारीमहागाई वाढली

जर्मनीच्या अर्थव्यवस्थेची ताकद उत्पादन क्षेत्रावर आहे. जर्मनीचा भार निर्यातीवर असतो. त्याच बळावर जर्मनी युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. पण कोरोनापासून मंदावलेले उत्पादन क्षेत्र पूर्णपणे सावरले नाही. त्यातच रशिया-युव्रेन युद्धामुळे उत्पादन घटले. पर्यायाने बेरोजगारी वाढली. महागाईही 7.2 टक्क्यांवर भडकली असून घरगुती वस्तूंच्या वापरात 1.2 टक्के घट झाली आहे