सलाईन स्टॅण्ड प्रकरण : डॉ. लहाने यांनी केली अधिकारी – कर्मचाऱ्यांची खरडपट्टी

37

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णास सलाईन लावण्यासाठी स्टॅण्ड मिळत नसल्यामुळे चक्क नऊ वर्षाच्या मुलीला सलाईन धरुन उभ राहवे लागले ही शरमेची बाब आहे, तुम्हाला कळत नाही का? तुमच्या चुकीमुळे प्रशासनाची बदनामी झाली आहे. रुग्णाना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन काम करा, असे सांगून सहसंचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

रत्नपूर तालुक्यातील मौजे भडजी येथील एकनाथ गवळे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना वार्डमध्ये आणून पलंगावर टाकण्यात आले. त्यावेळी त्या ठिकाणी सलाईनचे स्टॅण्ड नसल्यामुळे नऊ वर्षाच्या मुलीस सलाईनची बॉटल धरुन उभे राहवे लागले होते. मुलगी सलाईनची बॉटल धरून उभी असतांना रुग्णांवर डॉक्टर उपचार करत होते, मात्र त्यांनी सलाईनचे स्टॅण्ड उपलब्ध करून दिले नाही. ही बातमी दैनिक सामनामधून प्रसिध्द करण्यात आली होती. या बातमीमुळे महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात होता. आरोग्य विभागाचे धिंदवडे निघाले आणि प्रशासनाची बदनामी झाली होती.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी रुग्णालयाची पाहणी केली. डॉ. लहाने यांनी विविध विभाग आणि वॉर्डांची पाहणी केली. यावेळी वॉर्ड क्रमांक -१९ मध्ये पोहोचल्यावर डॉ. लहाने यांनी लहान मुलीला सलाईन स्टँड धरण्याच्या प्रकाराचा समाचार घेतला. यावेळी अधिकारी – कर्मचाऱ्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. लहाने यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळ्ळीकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. सरोजनी जाधव, आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या