Ghatkopar hoarding collapse : भावेश भिंडेला राजस्थानातून अटक

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या भावेश भिंडेला क्राईम ब्रँचने राजस्थानातील उदयपूर येथील एका हॉटेलमधून बेडय़ा ठोकल्या. भिंडेला पुढील तपासासाठी पंतनगर पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे. पोलिसांनी पकडू नये म्हणून भिंडे हा उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

घाटकोपर येथील हार्ंडग दुर्घटनेत एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आहे. बेकायदेशीर बॅनर उभारून 16 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भिंडेच्या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता. दुर्घटनेनंतर भिंडे हा पळून गेला होता. भिंडेच्या अटकेसाठी पोलिसांनी 7 पथके तयार केली होती. पोलीस मागावर असल्याचे समजताच भिंडे हा सुरुवातीला लोणावळा येथे गेला. पोलीस मागावर असल्याचे समजताच लोणावळा येथे गेल्यावर भिंडेने त्याचा मोबाईल बंद केला. त्यामुळे भिंडेचा थांगपता लागत नव्हता.

लोणावळा येथून त्यानंतर तो कल्याणच्या शिळफाटा येथून तो गुजरातच्या अहमदाबाद येथे गेला. तेथे तो काही तास थांबला. त्यानंतर भिंडेने उदयपूर गाठले. तेथील एका हॉटेलमध्ये त्याने बनावट नावाने हॉटेलमध्ये रूम बुक केली. तेथे तो त्या रूममध्ये राहत होता. भिंडे हा उदयपूर येथील हॉटेलमध्ये असल्याचे समजताच क्राईम ब्रँचचे एक पथक त्या हॉटेलमध्ये गेले. पोलिसांनी आज सायंकाळी सापळा रचून भिंडेच्या मुसक्या आवळल्या. रात्री उशिरा भिंडेला अटक करून मुंबईत आणले जात होते.