घाटकोपर, विक्रोळी, भांडूपमध्ये गॅस गळतीच्या दुर्गंधीने घबराट

मुंबईत आज घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, गोवंडी, मुलुंड, पवई परिसरात गॅस गळतीच्या दुर्गंधीने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा घबराट पसरली. सायंकाळी 4.30 च्या सुमारास हा गॅस गळतीची दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागात फोन करून तक्रारी दाखल केल्या. यानंतर पालिकेने तातडीने संबंधित प्रकाराचा तपास केला. मात्र दोन तासांतच हा प्रकार बंद झाला. दरम्यान, आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेने अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमसह यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त प्रभात रहांगदळे यांनी दिली.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरात अचानक सायंकाळच्या सुमारास गॅस गळतीची दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांची घबराट उडाली. रहिवासी-दुकानदार बाहेर आले. पालिकेच्या आपत्कालीन विभागात याबाबत सुमारे 10 कॉल आले. यानंतर तातडीने संबंधित विभागात पालिकेच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. यामध्ये ‘हॅजमॅट व्हॅन’, ‘गॅस डिटेक्टर’च्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. मात्र कोणत्याही ठिकाणी गॅसगळती आढळली नाही. त्यामुळे संबंधित गॅस दुर्गंधीबाबत नागरिकांमध्ये अजूनही भितीचे वातावरण आहे. दरम्यान, संबंधित भागात जूनमध्येही असा प्रकार घडला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्यही अशीच घटना घडली होती. मात्र संबंधित भागातील कोणत्याही गॅस कंपनीने गॅस गळती झाल्याचे स्पष्ट केले नव्हते. शिवाय पालिकेलाही गॅस गळती सापडली नव्हती. त्यामुळे गॅस दुर्गंधीबाबत गूढ निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या