बांग्लादेशच्या फलंदाजाला भूताने बाद केले?…वाचा नेमके काय घडले….

चमत्कार चित्रपटात भूताची भूमिका साकारणारा नसरुद्दीन शहा आपल्या करामतीने क्रिकेट सामना जिकूंन देतो, असे दाखवण्यात आले आहे. अशीच एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. झिम्बाब्बे- बांग्लादेशदरम्यान झालेल्या टी-20 सामन्यात घडलेल्या या विचित्र घटनेची चर्चा होत आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे फलंदाजाला भूताने बाद केले काय, अशी चर्चा रंगली आहे.

या सामन्यावेळी स्टंपवरील बेल्स आपोआप खाली पडल्या. त्यानंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंनी फलंदाज हिटविकेट झाल्याचे सांगत त्याला बाद करण्याचे अपील केले. या घटनेने पंचही चक्रावून गेले. बांग्लादेशची फंलदाजी सुरू असताना 18 व्या षटकात ही विचित्र घटना घडली. मोहम्मद सैफुद्दीन फलंदाजी करत होता. त्यावेळी तेंदई चतरा आपल्या षटकातील पाचवा चेंडू टाकण्याच्या बेतात होता. त्याचवेळी स्टंपवरील बेल्स अचानक आपोआप पडल्या. बेल्सचा आवाज झाल्याने सैफुद्दीनने मागे वळून पाहिले. बेल्स पडल्याचे त्याच्या लक्षात आले.मात्र, बेल्स कशा पडल्या, या प्रश्नाने तोही चक्रावून गेला.

या घटनेने पंचापुढे मोठा पेच उभा राहिला. चेंडू टाकला नसताना आणि हिट विकेट नसताना बेल्स आपोआप पडल्याने कोणता निर्णय घ्यायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. पंचांनी घटनेची माहिती घेतली आणि अनेकदा घटनेचे फूटेज पाहिले. सैफुद्दीने स्टंपपासून लांब उभा आहे. त्याच्या बॅटने स्टंप किंवा बेल्स पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे हवेनेच बेस्ल पडले असावेत, असा निष्कर्ष काढत, त्याला नाबाद घोषित करण्यात आले.

या घटनेनंतर सोशल मिडीयावर या घटनेचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेकांनी सैफुद्दीनला भूताने बाद केले काय, असा मजेशीर सवाल केला आहे. त्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे. हा व्हिडीओ 82 हजारवेळा बघण्यात आला असून त्याला 4100 लाईक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. त्यामुळे क्रिकेट, भूत आणि चमत्कार अशी चर्चा रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या