गुलाम नबी आझाद यांची नवीन पक्षाची घोषणा, जाहीर केलं नाव

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी नुकतेच पाच दशकांपासून काँग्रेसशी असलेलं नातं तोडले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली असून त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे.

जम्मू येथे आझाद यांनी आपल्या पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या या नवीन पक्षाचं नाव डेमोक्रेटिक आझाद पार्टी असं असणार आहे. आझाद यांनी याबाबत जम्मू येथे माध्यमांशी बोलताना माहिती दिली. ते म्हणाले की, माझ्याकडे उर्दू, संस्कृत इत्यादी भाषांमधली सुमारे 1500 नावं सुचवण्यात आली होती. उर्दू आणि हिंदी भाषेचं मिश्रण म्हणजे हिंदुस्थानी आहे. आम्हाला वाटतं की, लोकशाहीचा पाया असलेला, शांततेचा संदेश देणारा आणि स्वतंत्र असा हा पक्ष असला पाहिजे. म्हणून या पक्षाचं नाव डेमोक्रेटिक आझाद पार्टी अस ठेवण्यात आलं आहे, असं ते म्हणाले.

सध्या गुलाम नबी आझाद हे तीन दिवसांच्या जम्मू-कश्मीर दौऱ्यावर आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरही आझाद यांनी जम्मू दौरा केला होता. त्या दरम्यान, आझाद यांनी नवीन पक्षासाठी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केली होती. दिल्ली येथे देखील पक्षाच्या नावावरून बरीच चर्चा सुरू होती.

73 वर्षांच्या आझाद यांनी 26 ऑगस्टला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर एक उपमुख्यमंत्री, 8 माजी मंत्री, एक माजी खासदार, 9 आमदार यासह मोठ्या प्रमाणात पंचायत राजच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिला.