गुलाम नबी आझाद यांना दहशतवाद्यांची धमकी

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी कश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभांपूर्वी आझाद यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न दहशतवाद्यांनी ही धमकी दिली आहे. सोशल मीडियावरही धमकीची पोस्टर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेशातील मुस्लिमांनी हिंदुस्थानवर दहशतवादी हल्ले करावेत, इस्लामिक स्टेटचे आवाहन

इस्लामिक स्टेटच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून मुस्लिमांना हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करण्याचे आवाहन केले आहे. अबू ओमर-अल-मुजाहिर या प्रवक्त्याने दक्षिण आणि आग्नेय आशियातील मुस्लिमांना हिंदुस्थान विरोधात एकवटण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाद्वारे मंगळवारी हे आवाहन करण्यात आले. हिंदुस्थानात सरकारकडून मुस्लिमांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. त्यामुळे हिंदुस्थानात इस्लामचे संरक्षण करणे हा इस्लामिक स्टेटचा उद्देश असल्याचे मुजाहिरने म्हटले आहे.

हिंदुस्थानातील मुस्लिमांना मुजाहिर म्हणाला की तुम्हा सर्वांना भीतीने ग्रासले आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या धर्माचे रक्षण करण्याचे धैर्य गमावले आहे. तुमच्यात आता शत्रूशी लढण्याची ताकद नाही. मुजाहिरने हे 32 मिनिटांचे भाषण अरबी भाषेत प्रसिद्ध केले आहे. यात पाकिस्तान, बांगलादेश, फिलिपाइन्स, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांनाही संबोधित करण्यात आले आहे. यामुळे आता हिंदुस्थानात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला आहे.

अबुजा, नायजेरिया आणि काँगो येथील तुरुंगातून कैद्यांना मुक्त करण्यासाठी हल्ले करणाऱ्या गटाच्या युनिट्सचे अल-मुजाहिरने कौतुक केले आहे. तसेच मुजाहिरने आपल्या भाषणात तालिबानवरही हल्ला चढवला आहे.यापूर्वी जुलैमध्ये मारला गेलेला अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीनेही असेच आवाहन केले होते. इस्लामिक स्टेटने नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची तसेच देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणण्याची धमकी दिली आहे. या संघटनेचे खलिफा इब्राहिम अवद अल-बद्री याने शत्रू देशांच्या यादीत हिंदुस्थानला स्थान दिले आहे.