काँग्रेसमध्ये पुन्हा संघर्ष उफाळला, आझाद यांच्यावर काँग्रेस नेत्याची सडकून टीका

काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आळवलेला बंडखोरीचा सूर अजूनही नरम पडल्याची चिन्हे दिसत नाहीयेत. काँग्रेस पक्षात सुधारणा व्हावी अशी मागणी करणारा नेत्यांचा एक गट तयार झाला असून त्याचे नाव G-23 असे ठेवण्यात आले आहे. या गटातील नेत्यांचे जम्मू-कश्मीरमध्ये पुतळे जाळण्यात आले. जम्मू-कश्मीरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा राग हा प्रामुख्याने गुलाम नबी आझाद यांच्यावर होता. पक्षाच्या पाठिशी उभे राहण्याच्या ऐवजी आझाद हे भाजपसोबतची मैत्री सांभाळत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

आझाद हे जम्मू कश्मीरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रचारात आले नाहीत, तेच आझाद हे पंतप्रधानांची तारीफ करण्यात पुढे असतात असं काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. शाहनवाज हुसेन नावाच्या एका काँग्रेस नेत्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की ‘काँग्रेसने ज्या व्यक्तीला मोठं केलं तोच आज या पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या व्यक्तीने जम्मू-कश्मीरसाठीचे कलम 370 हटविले त्या नरेंद्र मोदी यांची आझाद तारीफ करत आहेत. आम्ही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मागणी करीत आहोत की आझाद यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जावी’

काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेले नेते सोमवारी जम्मूमध्ये एकत्र आले होते. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, भूपेंद्र सिंह हुड्डा, मनीष तिवारी, राज बब्बर आणि विवेक तन्खा यांचा समावेश होता. या सगळ्या नेत्यांनी डोक्याला भगवे फेटे बांधले होते. आझाद यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. मोदी आपली पार्श्वभूमी विसरलेले नाहीत. मोदी लहानपणी चहा विकायचे आणि भांडी घासत होते. मोदींपासून लोकांनी शिकायला पाहिजे असं विधान आझाद यांनी केलं होतं. G-23 गटातील काही नाराज नेते आता पुन्हा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी जुळवून घेत असल्याचं बोललं जात आहे. शशी थरूर आणि जितीन प्रसाद हे देखील पूर्वी नाराज काँग्रेसी नेत्यांच्या गटात सामील होते, मात्र आता ते काँग्रेस हायकमांडसोबत असल्याचं सांगितलं जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या