‘त्याने’ २६ फुटी अजगर मारला आणि तळून खाल्ला

91

सामना ऑनलाईन | सुमात्रा

इंडोनेशियातील सुमात्राच्या बतांग गनसाल जिल्ह्यात काम करणाऱ्या रॉबर्ट नबाबन नावाच्या सुरक्षा रक्षकाने २६ फुटी अजगर खूप वेळ झटापट करुन ठार मारले. अजगराशी झालेल्या संघर्षात रॉबर्टच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र अजगराला ठार करुन ग्रामस्थांचे रक्षण करण्यात यशस्वी झाल्यामुळे तो स्थानिकांचा हिरो झाला आहे.

ग्रामस्थांना २६ फुटी अजगर बघता यावा यासाठी काही वेळ ठार केलेले अजगर रॉबर्टने एका झाडावर टांगून ठेवले होते. नंतर ग्रामस्थांनी भाजून आणि तळून अजगरावर यथेच्छ ताव मारला.

गनसाल जिल्ह्यात अनेकदा मोठे अजगर आढळले आहेत. उष्णतेच्या दिवसांत पाण्याच्या शोधासाठी महाकाय अजगर बाहेर पडतात आणि नकळतपणे निवासी वस्तीत प्रवेश करतात, असे स्थानिकांनी सांगितले. पामची शेती होत असल्यामुळे गनसाल जिल्ह्यात उंदरांचा सुळसुळाट आहे. या उंदरांची शिकार करण्याच्या निमित्ताने निवासी वस्तीत अनेकदा अजगर येतात, असेही स्थानिकांनी सांगितले.

रॉबर्ट नबाबन याला २६ फुटी अजगर लागवडीच्या वेळी रस्त्यावर दिसला होता. अजगर रस्त्यावर असल्यामुळे ग्रामस्थ घाबरले होते. अखेर ३७ वर्षांच्या रॉबर्टने धाडस केले आणि अजगराशी थेट संघर्ष केला. उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली तरी अजगराचे दोन दात उचकटण्यात तसेच अजगराला ठार करण्यात रॉबर्ट यशस्वी झाला. आता डॉक्टरांकडून उजव्या हातावर उपचार करुन घेईन असे त्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या