‘धंदा’ करायला गेला आणि धंद्याला लागला, जिगोलो बनण्याच्या नादात तरुण गंडला

2153

कोरोनाच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना नोकरी जाण्याचे भय असल्याने त्यांनी पोटापाण्यासाठी पर्यायी मार्ग शोधायला सुरुवात केली. या काळात जर वेगळा ‘धंदा’ करुन जास्त पैसे कमावता आले तर असा विचार एका तरुणाच्या डोक्यात आला. आयटी क्षेत्रात काम करत असलेल्या या तरुणाने शोधाशोध करायला सुरुवात केली असता त्याच्याशी एका एस्कॉर्ट कंपनीने संपर्क साधला. आणि इथेच त्याचे वांदे झाले.

नंदन (बदललेले नाव) नावाचा हा तरुण मान्यता टेक पार्कमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये कामाला आहे. त्याच्या कंपनीतून अनेकांना नोकरीवरून काढायला सुरुवात झाली होती. आपल्यालाही नोकरीवरून काढलं जाऊ शकतं, या विचाराने त्याला ग्रासलं होतं. जर नोकरीवरून काढलं तर पैसे कसे कमवायचे हा प्रश्न त्याला सतावत होता. त्याने शोधाशोध करायला सुरुवात केली आणि त्याने ठरवलं होतं की ‘जिगोलो’ बनायचं. नोकरी विषयक माहिती देणाऱ्या एका वेबसाईटवर त्याने जिगोलोसाठीची जाहिरात बघितली होती, ती पाहूनच त्याने हा निर्णय घेतला होता. 7 जुलैला नंदनने वेबसाईटवरून मिळालेल्या व्हॉटसअप नंबरवर जिगोलो बनायची इच्छा व्यक्त करत मेसेज पाठवला होता.

हा मेसेज पाठवल्यानंतर नंदनला एक फोन आला. पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने त्याची ओळख रौनक अशी करून दिली होती. रौनकने सांगितलं की त्यांच्या कंपनीकडून जिगोला बनायचं असेल तर त्यासाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 12500 रुपये सदस्य शुल्क म्हणून भरावे लागतील. हे पैसे भरल्यानंतर नंदनला पुन्हा एक फोन आला. आपण त्याच संस्थेतील दुसऱ्या विभागातून बोलत असल्याचं त्याने नंदनला सांगितलं. यानंतर नंदनला आपण त्याच संस्थेतील वेगळ्या विभागातून बोलत असल्याचं सांगत अनेकदा फोन आले. दरवेळी नंदन ते सांगतील तसे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करत होता. 83500 रुपये गमावल्यानंतर नंदनला ही काहीतरी गडबड असल्यचा संशय आला.

नंदनला आपण फसवले गेल्याचं कळाल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी या बाबत बंगलोर मिररला माहिती देताना सांगितलं की अशा अनेक बोगस वेबसाईट कार्यरत असून गंडा घालणारी माणसं नंदनप्रमाणे अनेक तरुणांना पसवत आहे. यामुळे ऑनलाईन नोकरी शोधणाऱ्यांनी साईटची नीट माहिती घेऊन मगच पुढील पावले उचलावी असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या