फुटीरतावादी नेत्याच्या नातवाला दिली सरकारी नोकरीचं बक्षिस

38

सामना ऑनलाईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सरकारी नियम धाब्यावर बसवून कश्मीरमधील फुटीरतावादी नेता सैय्यद अली शाह गिलानी याचा नातू अनिस-उल-इस्लाम याला सरकारी नोकरी दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गिलानीच्या नातवाला ही नोकरी दहशतवादी बुरहान वाणी याच्या मृत्यूनंतर कश्मीरमध्ये उसळलेल्या दंगलीदरम्यान देण्यात आली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रात याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. मुफ्ती यांच्या अखत्यारित येणाऱ्या कश्मीर राज्य पर्यटन विभागात अनिसची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी लोकसेवा आयोगाबरोबरच इतर सामायिक परिक्षा आवश्यक असतात पण त्या न घेता मुफ्ती यांनी अनिसची परस्पर नियुक्ती केली आहे. जम्मू-कश्मीर पर्यटन विभागात संशोधन अधिकारी पदावर त्याची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी दरमहा १ लाख रुपये पगार त्याला देण्यात येत आहे.

अनीस याने जालंदर,पंजाब येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. गिलानी यांच्या अनेक सभांमध्ये  त्याने सहभाग घेतला आहे. बुरहाण वाणीच्या मृत्यूनंतर कश्मीरमध्ये उसळलेल्या दंगलीतही त्याचा सक्रिय सहभाग होता. जम्मू-कश्मीर सीआयडीने २००९ साली त्याच्याविरोधात दिलेल्या अहवालानंतर अनिसला पासपोर्ट देखील नाकारण्यात आला होता.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला पासपोर्ट देण्यात आला होता.त्यानंतर अमितने एमबीचे दुसऱ्या वर्षाचे शिक्षण लंडनमध्ये जाऊन पूर्ण केले होते.

पण तरीही सरकारी नोकरीसाठी सक्तीच्या असलेल्या परीक्षा न देता त्याला मुफ्तींनी सरकारी नोकरी मिळवून दिली आहे. दरम्यान अनिसची नियुक्ती सरकारी नियमानुसारच झाल्याचा दावा जम्मू-कश्मीर पर्यटन विभागाचे प्रमुख फारुख शाह यांनी केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या