तिसरी इयत्तेतील मुलीकडे सापडला देशी कट्टा,वडीलांविरोधात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन,हिंगोली

हिंगोली शहरातील विद्यानिकेतन इंग्लिश शाळेच्या तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलीकडून पोलिसांनी देशी कट्टा,९ जिवंत काडतुसे आणि दोन पुंगळ्या जप्त केल्याने शहरात जबरदस्त खळबळ उडाली आहे.ही मुलगी वर्गामध्ये तिच्या मैत्रिणींना हा देशी कट्टा दाखवत होती. सुदैवाने हा देशी कट्टा हाताळताना कोणतीही दुर्घटना झाली नाही.

या मुलीकडे बंदुक असल्याचं शिक्षकांना कळालं, त्यांनी तातडीने शाळेच्या मुख्याध्यापकांना याबाबत माहिती दिली. मुख्याध्यापकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हा देशी कट्टा आणि काडतूसे जप्त केली. चौकशीमध्ये पोलिसांना कळालं की हा देशी कट्टा तिच्या वडीलांचा आहे. ते सिंचन विभागामध्ये चालक म्हणून कार्यकरत आहे. त्यांनी घरामध्ये बेकायदा कट्टा ठेवलाच कसा हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. यामुळेच पोलिसांनी या मुलीच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.