फाळणीनंतर सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवले नाही ही आमची चूक – गिरीराज सिंह

563

देशाच्या फाळणीनंतर 1947 मध्ये सर्व मुस्लिम बांधवांची रवानगी धर्माच्या नावाखाली निर्माण केलेल्या पाकिस्तानात केली नाही, ही आमच्या पूर्वजांची मोठी चूकच होती. त्याच चुकीची फळे आम्ही आता भोगतो आहोत, असे खळबळजनक विधान करीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. ते बिहारच्या पूर्णिया येथे पत्रकारांशी बोलत होते.

1947 अगोदर आमचे पूर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि पाकिस्तानचे जनक बॅरिस्टर मोहमद अली जिन्ना इस्लामी राष्ट्र बनवण्याची योजना आखत होते, असे सांगून गिरीराज म्हणाले, आमच्या पूर्वजांनी फाळणीच्या वेळेस सर्व मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवले नाही, त्या चुकीचा त्रास आम्हाला आज होतोय. देशाप्रती समर्पित होण्याची वेळ आता आलीय. आम्हा हिंदूंना निर्वासित व्हायची वेळ आली तर आम्ही कुठे जायचे याचा विचार आम्ही आम्ही गंभीरपणे करायला हवा. हिंदुस्थान सोडला तर हिंदूंना आश्रय घेता येईल असा एकही देश या भूतलावर नाही.

भाजप नेते गिरीराज सिंह हे “फायरब्रॅन्ड” राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची वादग्रस्त वक्तव्ये अनेकदा देशात मोठा वादंग निर्माण करायला कारणीभूत ठरली आहेत. आता नव्या वक्तव्याने त्यात आणखी भर पडली आहे.

गिरीराज उवाच …

  • देवबंद ही दहशतवादाची गंगोत्रीच आहे. जगभरात जितके दहशतवादी हल्ले झालेत त्यातील दहशतवाद्यांची तार कुठून ना कुठून देवबंदशी जुळलेली आहे. देवबंदने नेहमीच दहशतवाद्यांची पाठराखण केली आहे. – 12 फेब्रुवारी 2020 (सहारनपूर ,युपी )
  • शाहिनबाग हा आत्मघाती बॉम्बर्सचा जत्थाच आहे. या आंदोलनात एक निष्पाप बालक थंडीने कुडकुडून मरण पावते आणि त्याची आंदोलक आई म्हणते मेरा बच्चा शहिद हुआ , याला आत्मघाती बॉम्बर म्हणायचे नाहीतर काय ? -6 फेब्रुवारी 2020 (शाहिनबाग ,नवी दिल्ली )
आपली प्रतिक्रिया द्या