भाजप नेते गिरीश महाजन यांना शिवीगाळ, कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर झाला राडा

जळगाव येथे भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर एका इसमाने माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली. तसेच पदाधिकाऱ्यांच्या वाहनांकडे दगड भिरकावल्याचा प्रकार घडला. याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

भाजपच्या बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणिक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठक आटोपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असतानाच एक इसम दरवाजातच त्यांच्यासमोर लोळत होता. मात्र, तो मनोरुग्ण असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेले. त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला व काही वेळानंतर ते परतले.

मात्र, या दरम्यान, विजय नामक या इसमाने गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून गाडीकडे एक दगड फेकला. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. या गोंधळानंतर पोलिसांनी भाजप कार्यालयात जाऊन पाहणी केली, मात्र, याबाबत कुठलाही गुन्हा दाखल किंवा नोंद करण्यात आलेला नाही.

सदर व्यक्ती मनोरुग्ण आहे. तो भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाकडून देण्यात आले आहे. मात्र सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या