शिक्षकांनी वडिलांसमोरच अल्पवयीन मुलीला चाबकाने चोपले, कारण वाचून धक्का बसेल

वडिलांसमोर एका अल्पवयीन मुलीला शाळेतील शिक्षक चाबकाने झोडत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चार शिक्षक चाबकाने एका मुलीला बदडत असल्याचे दिसते. चाबकाच्या मारामुळे मुलगी वेदनेने विव्हळते. हा सर्व प्रकार तिच्या वडिलांच्या समोर सुरू होता. नायजेरियातील एका इस्लामिक स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुलीच्या वडिलांवर प्रचंड टीका होऊ लागली. मात्र झाल्या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना मुलीचे वडील म्हणाले की, मुलीला दारु पिताना पाहिल्यानंतर मी व्यथित झालो. यानंतर मुलीच्या शाळेशी संपर्क केला आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. तसेच तिला योग्य शिक्षा देण्याचीही विनंती केली. ही शिक्षा देताना मला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशीही विनंती त्यांना केली होती, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.

व्हायरल व्हिड़ीओमध्ये दिसणारी मुलगी एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यात तिने दारुचे सेवन केले होते. याचा व्हिडीओही व्हायरल झाला. तिच्यासोबत अन्य एक विद्यार्थीही या व्हिडीओमध्ये दिसला होता. त्यालाही शिक्षक चाबकाने फोडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेतर्फेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनंती केल्यानंतर त्यांना ही शिक्षा देण्यात आली. तसेच इस्लामिक कायद्यानुसारच ही शिक्षा दिल्याचे शाळेने म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या