मोबाइलवर गेम खेळता, खेळता डोळा गमावला

95

सामना ऑनलाईन । बीजिंग

चीनमधील एका २१ वर्षीय तरुणीला मोबाइलवर गेम खेळणे महागात पडले आहे. दिवसभर मोबाइलवर गेम खेळल्याने या तरुणीचा डावा डोळाच निकामी झाला आहे. तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टीच गेली असून तिला रेटिनल आर्टरी ओक्लूशन (आरएओ) ही व्याधी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सदर तरुणी चीनच्या पश्चिम उत्तर प्रांतातील शांक्सी येथील रहिवासी आहे. मोबाइलवर गेम खेळण्याचा तिला छंद होता. रोज ती कित्येक तास मोबाइलवर गेम खेळायची. काही दिवसांपूर्वी ती ‘ऑनर ऑफ किंग्स’ हा ऑनलाइन गेम खेळत होती. ती या गेममध्ये इतकी रमली कि हा गेम खेळता खेळता दिवस मावळला हे देखील तिला कळले नाही. गेम खेळून झाल्यानंतर तिने मोबाइलवरुन नजर हटवताच तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिला डाव्या डोळ्याने काहीच दिसेनासा झाले. घरच्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला रेटिनल आर्टरी ओक्लूशन (आरएओ) झाल्याचे सांगितले. या आजारात डोळ्यातील रक्तप्रवाह अचानक थांबतो. साधारणपणे ही समस्या वृध्दांमध्ये आढळते. पण कित्येक तास मोबाइलवर गेम खेळल्यामुळे तरुणीच्या डोळ्यांवर ताण आला आणि डाव्या डोळ्याचा रक्तपुरवठाच थांबला. त्यामुळे तिची डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. भविष्यात ती कधीही डाव्या डोळ्याने पाहू शकणार नाही असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या