मुलीने मागवले ऑनलाईन जेवण, ऑर्डर घेऊन पोहोचले 42 डिलिव्हरी बॉय!

ऑनलाइन फूड ऑर्डर केल्यानंतर चुपून दुसऱयांची ऑर्डर येणे हा प्रकार तसा नवीन नाही. परंतु फिलिपिन्समध्ये नुकतीच एक गमतीदार घटना घडली आहे. एका मुलीने नुकतीच ऑनलाईन जेवणाची ऑर्डर केली.

ही ऑर्डर डिलिव्हरी करण्यासाठी त्या मुलीच्या घरी चुकून एक, दोन नव्हते तर तब्बल 42 डिलिव्हरी बॉय पोहोचले. ही घटना सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱयांनादेखील हसू फुटले.

फिलिपिन्समधील सेबु सिटीमधील 7 वर्षीय एका शाळकरी मुलीने ऑनलाइन चिकन फिलेट मागवले होते. आजीसोबत ती ऑर्डरची वाट पाहत होती. काही वेळानंतर ती मुलगी राहते त्या गल्लीत डिलिव्हरी बॉयची रांग लागली. तब्बल 42 डिलिव्हरी बॉय एकत्र आले.

आपल्या आजूबाजूला हे काय सुरू आहे हे स्थानिकांना कळेना. तेथीलच एका मुलाने डिलिव्हरी बॉयच्या रांगेचा हा फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला. बघता बघता हा फोटो व्हायरल झाला.

शेजाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, स्लो इंटरनेट कनेक्शनमुळे या मुलीने चुकून ऑर्डरवर अनेकदा टॅप केले. त्यामुळे हा प्रकार घडला. मात्र एकाचवेळी इतके डिलिव्हरी बॉय आल्याने तिला रडू कोसळले. इतक्या ऑर्डर घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसेदेखील नव्हते. शेवटी त्यातील काही पाकिटे आम्ही विकत घेतली. आणि काही डिलीव्हरी बॉयला आम्ही रिटर्न पाठवले.

आपली प्रतिक्रिया द्या