शोले स्टाइल ऑनलाइन गेमने घेतला तरुणीचा बळी

सामना ऑनलाईन । ग्वाल्हेर

ब्लू व्हेल, मोमो या जीवघेण्या ऑनलाइन गेमनंतर आता शोले स्टाइल ‘रुसी रुले’ या खेळाच्या वेडाने ग्वाल्हेरच्या 21 वर्षीय तरुणीने स्वतःवर गोळय़ा झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. करिष्मा यादव असे आत्महत्याग्रस्त युवतीचे नाव असून तिचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.

करिष्मा तिच्या दिल्लीतील मित्रांसोबत व्हॉटस्अॅपवर व्हिडीओ कॉलवर गप्पा मारत होती, तर दुसरीकडे ऑनलाइन ‘रुसी रुले’ गेम खेळत होती. मित्रांशी गप्पा मारताना करिष्माने आपल्याजवळ असलेली बंदूक मित्रांना दाखवली. त्यानंतर बंदुकीत एकच गोळी टाकून बंदुकीचे चेंबर फिरवले. तिने बंदूक चालवली आणि दुर्दैवाने गोळी लागून तिचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला…

काय आहे ‘रुसी रुले’ गेम
‘शोले’ चित्रपटात गब्बर कालियाच्या डोक्यावर बंदूक ठेवून आदमी तीन, गोलिया दो, असे म्हणून रायफलचा चेंबर फिरवत म्हणतो, अब कहा है गोली, कहा नही, मुझे कूच नही पता. त्यानंतर त्याने ट्रिगर दाबताच बार फुकट जाऊन कालिया वाचतो. तशाच प्रकारच्या नशिबाची जीवघेणी परीक्षा घेणाऱ्या ‘रुसी रुले’ या बंदुकीच्या भयानक ऑनलाइन खेळाने देशभरात युवकांना वेड लावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या