व्हॉट्स अॅप नंबर हॅक करुन लुबाडले

52

सामना ऑनलाईन। पुणे

पुण्यातील एका तरुणीचा व्हॉट्स अॅप नंबर हॅक करुन तिच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्तींकडून हॅकर्सनी पैसे लुबाडल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. तरुणीने सायबर सेलमध्ये याप्रकरणाची तक्रार केली आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकडून आलेली लिंक उघडू नये असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

पुण्यातील या तरुणीला २२ फेब्रुवारीला अनोळखी नंबरवरुन एक मेसेज आला. या मेसेजमध्ये पाठवण्यात आलेली लिंक परत त्याच नंबरवर पाठवावी असे त्यात सूचित करण्यात आले होते. यामुळे तरुणीने ती लिंक पुन्हा त्याच नंबरवर पाठवली. त्यानंतर हॅकर्सनी तिचा नंबर हॅक करुन तीच्या मोबाईलमधील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट नंबर चोरले. त्यातील काहीजणांशी संपर्क साधला आणि तरुणीला पैशांची गरज असल्याचे सांगत पेटीएम खात्यात पैसे टाकण्यास सांगितले. तरुणीला ओळखत असल्याने काहीजणांनी पेटीएम खात्यावर पैसे पाठवले. हा प्रकार तरुणीस कळताच आपण पैशांची मागणी केली नसल्याचे तीने सगळ्यांना सांगितले. त्यानंतर तिने सायबर सेलकडे याप्रकरणाची तक्रार केली.सायबर सेलने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या