एक राखी जवानोके नाम, उर्दू शाळेच्या लेकींनी 260 सैनिकांना राख्या बांधल्या

सीमेवर तैनात असलेल्या शूर सैनिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या उर्दू शाळेतील 260 मुलींनी स्वखर्चाने तयार केलेल्या राख्या मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या सहकार्यातून थेट नगर येथील भिंगार आर्मी कॅम्पात जाऊन 260 सैनिकांना राख्या बांधून ‘एक राखी जवानोके नाम’ हा अभिनव उपक्रम राबवला तसेच सैनिकांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केली.

शहरात नगर परिषदेच्या शिक्षण विभागाच्या एकूण बारा शाळा सुरू आहेत. यातच मराठी माध्यमाव्यतिरिक्त उर्दू माध्यमाची शाळादेखील आहे. जसे की, “हर घर तिरंगा” उपक्रम, विविध शालेय स्पर्धा चित्रकला, वकृत्व, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी इ. विषयावर शालेय विद्यार्थ्यांना या उत्सवात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील नागरिकांना या अमृत महोत्सवात सहभागी होणे कामी विविध पद्धतीने जनजागृतीदेखील केली जात आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गोसावी यांच्या विचारातून घर, कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्यापासून दूर राहून सैनिक कर्तव्य बजावत असतात. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर लढतात, त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभिमान ही वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, या उद्देशाने पोस्टाने जवानांना राख्या पाठविण्यापेक्षा नगरपालिकेच्या उर्दू शाळेतील मुलींनी बनविलेल्या राख्या नगर भिंगार येथील आर्मी कॅम्पस येथे जाऊन सैनिकांना बांधाव्या यासाठी यातील 32 विद्यार्थिनींना बसद्वारे भिंगार आर्मी कॅम्पला पाठवून रक्षाबंधनानिमित्त थेट सैनिकांना राख्या बांधून ‘एक राखी जवानोंके नाम” हा उपक्रम यशस्वी केला.

देशाचे रक्षण करणारे सैनिक माझे बांधव आहेत. आता मला भाऊ मिळाला आहे. मी माझ्या सैनिक भावाला दरवर्षी राखी पाठवणार आहे, अशी भावना मुलींनी व्यक्त केली. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची प्रत्यक्ष संधी या उपक्रमातून मुलींनाही मिळाली, असे त्यांनी सांगितले.

याच उपक्रमाअंतर्गत बुधवारी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा येथे ‘हर घर झेंडा’ या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय ध्वज तिरंगा विक्री केंद्राचा शुभारंभ करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ‘एक राखी जवानोके नाम’ या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या .

मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी ज्ञानेश्वर पटारे, मुख्याध्यापक शबनम खान, शोभा गाडेकर, कैलास साळगट सर, मु.बशिर खान, गोपाळ कोळी, शेख नसीम शेख, शेख अंजुम, एम. के. आढाव विद्यालयाच्या भावना गवांदे. आदींनी परिश्रम घेतले.