मुलींच्या खोलीत घुसून तरुणाचे अश्लिल चाळे, सीसीटीव्हीमध्ये संतापजनक प्रकार कैद

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

अहमदाबादच्या श्रीमंत भागातील पेईंग गेस्ट म्हणून राहण्याऱ्या मुलींच्या खोलीतील एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. नवरंगपुरा भागातील सीजी रोडवर असणाऱ्या पेईंग गेस्ट घरात रात्रीच्या वेळी एक अज्ञात तरूण प्रवेश करतो आणि हॉलमध्ये गाढ झोपेत असणाऱ्या मुलीसोबत अश्लिल कृत्य करतो. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, हा सर्व प्रकार 14 जून रोजीची असून बदनामीच्या भीतीने मुलींनी याची पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. परंतु सीसीटीव्ही समोर आल्यानंतर गुजरात महिला आयोगाने याची दखल घेत तपासाचे आदेश दिले आहेत. अहमदाबादच्या पोलीस अधीक्षकांकडे महिला आयोगाने याप्रकरणाचा अहवाल मागवला आहे. पोलिसांनीही सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवरंगपुरा भागातील सीजी रोडवर चार मजल्याचे हे घर आहे. तळमजल्यावर कुटुंब राहतात, तर वरचा मजला पेईंग गेस्ट म्हणून देण्यात आला आहे. येथे तब्बल 19 मुली पेईंग गेस्ट म्हणून राहतात. अज्ञात तरुणाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर मुलींमध्य भीतीचे वातावरण आहे. हा प्रकार ज्या मुलीसोबत झाला ती येथील वॉर्डनची मुलगी असून आईला बरे नसल्याने तिच्या जागी कामास आली होती. तसेच येथील एका मुलीने अधिक माहिती देताना सांगितले की, असाच प्रकार मुलीच्या आईसोबतही झाला होता.