नोकरी मिळवण्याकरिता मुलीने लढवली अनोखी शक्कल, केकवर पाठवला बायोडेटा

नोकरीचा शोध घेणाऱ्या एका मुलीला अनोखी संकल्पना सुचली. तिची वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना तिने सोशल मिडियावर एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. व्हायरल झालेल्या या तिच्या पोस्टला लोकांनी ‘आउट ऑफ द बॉक्स’, असे म्हणत दाद दिली आहे.

कार्ली पॅव्हलिनॅक ब्लॅकबर्न असे या तरुणीचे नाव आहे. नोकरी मिळवण्यासाठी काही दिवस ती सर्जनशील कल्पनांवर संशोधन करत होती. त्यावेळी तिचे सहकारी ट्रेंट गॅडर यांनी तिला सांगितले की, ‘नायके’ ही बुटांची कंपनी तुझ्यासारख्या सर्जनशील लोकांचा शोध घेत असते. त्यामुळे तू काहीतरी असे कर, ज्यामुळे तुझ्यातील वेगळेपण त्यांना दिसेल. हे कळल्यावर कार्लीने या कंपनीचा शोध घेण्यास सुरुवात केली. कंपनीबाबत संशोधन केल्यावर तिच्या असे लक्षात आले की, नायके ही कंपनी सध्या कोणत्याही नवीन व्यक्तिला नोकरीवर ठेवू इच्छित नाही, मात्र कार्लीला असे काहीतरी वेगळे करायचे होते ज्यामुळे कंपनी तिला कायम लक्षात ठेवेल. यामुळेच तिने ‘केक रेझ्युमे’ कंपनीला पाठवण्याचा निर्णय घेतला. याकरिता तिने केकवरच आपली संपूर्ण माहिती लिहून कंपनीला पाठवली.

त्यानंतर कार्लीने कॅलिफोर्नियाहून बेव्हर्टन, ओरेगॉन येथील नायके कंपनीच्या मुख्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. तिला केक फक्त नायकेच्या टीमलाच द्यायचा होता. केकवर रेझ्युमे पाठवल्यानंतर तिने लिंक्डइनद्वारे ही पोस्ट शेअर केली. नाइके जेडीआई डे (जस्‍ट डू इट डे) या समारंभात तिचा हा रेझ्युमे केक ठेवण्यात आला होता. यावर तिने Nike ला रेझ्युमे केक पाठवला असून केकवरच संपूर्ण बायोडेटा असल्याचा तपशील लिहिला आहे. यामध्ये तिने ज्यांनी तिचा केक वितरीत केला ते इन्ट्राग्रामचे डेनिस बाल्डविन यांचेही आभार मानले आहेत.

कार्लीने Linkedin वर शेअर केलेल्या तिच्या पोस्टला 1 लाखांहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी तिला ही पोस्ट शेअर केल्यानंतर तुला नायकेकडून ऑफर मिळाली का? असेही विचारले आहे तसेच काही लोकांना तिने बुटांच्या कंपनीत नोकरी करण्यासाठी लढवलेली  ही अनोखी शक्कल अजिबात आवडली नसल्याचे आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. अँजेला नावाच्या युजरने लिहिले की, अशाप्रकारे रेझ्युमे पाठवणे हा नोकरी मिळवण्याचा खूप विचित्र मार्ग आहे. जर कोणी माझ्यासोबत असे केले तर मी त्याला कधीही नोकरी देणार नाही. असे असले तरीही कार्लीला सुचलेली वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना अनेकांना फारच आवडली. काही लोकांनी केकवर रेझ्युमे लिहून पाठवण्याच्या तिच्या कल्पनेचे खूप कौतुक केले आहे.