धोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या! गौतम गंभीरची मागणी

40

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

माजी कर्णधार आणि टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनी याच्या भवितव्याबाबत आता बीसीसीआयने भावनिक नव्हे, तर प्रॅक्टिकल निर्णय घेण्याची गरज आहे. कारण यंदाच्या विश्वचषकातील हिंदुस्थानी संघाची कामगिरी पाहता आता व्यवहारी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आता शोध घेतला तरच पुढच्या विश्वचषकापर्यंत आपल्याला जिगरबाज यष्टिरक्षक मिळू शकेल, असे परखड मत हिंदुस्थानी संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि खासदार गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.

रविवारी होणाऱया बीसीसीआयच्या बैठकीत वेस्ट इंडीज दौऱयासाठीच्या हिंदुस्थानी संघाची निवड केली जाणार आहे. या बैठकीत कर्णधार विराट कोहलीचे कर्णधारपद आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबतही विचार केला जाणार आहे. त्यामुळे गंभीरने याप्रसंगी टीम इंडियाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आता धोनीबाबत भावनिक नको, तर प्रॅक्टिकल निर्णय घेण्याचे आवाहन बीसीसीआयला केले आहे.

रांगेत उभे आहेत

टीम इंडियात खेळण्याची संधी मिळावी म्हणून अनेक प्रतिभावान आणि होतकरू युवा क्रिकेटपटू रांगेत उभे आहेत. त्यांचाही विचार बीसीसीआयने करायला हवा. जुने आपण किती दिवस कवटाळून बसायचे असा सवाल करीत गंभीर म्हणाला, भविष्यात आपल्याला धोनीचा वारसदार यष्टिरक्षक शोधावाच लागेल. आता रिषभ पंत, इशान किशन आणि संजू सॅमसनसारखे युवा यष्टिरक्षक-फलंदाज राष्ट्रीय संघातील पदार्पणासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांचाही विचार आपण करायला हवा. स्वतः धोनीने कर्णधार असताना अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात पुढाकार घेतला होता, याचेही स्मरण निवड समितीने ठेवायला हवे.

पुरेशी संधी मिळायला हवी

यष्टिरक्षकाच्या जागेसाठी म्हणाल तर नव्या खेळाडूंना पुरेशी संधी मिळायला हवी. नव्या यष्टिरक्षक-फलंदाजांना किमान दीड वर्ष तरी सतत खेळवायला हवे. एखादा अपयशी ठरला तर त्याच्या जागी दुसऱयाला संधी द्या. असे केले तरच पुढच्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत आपल्याला धोनीचा समर्थ वारसदार मिळू शकेल, असेही गंभीरने स्पष्ट केले.

कर्णधाराला संघाच्या यशाचे सारे श्रेय देणे अथवा अपयशाचे सर्व खापर एकटय़ा कर्णधाराच्या माथी फोडणे योग्य नाही. कारण क्रिकेट हा सामुदायिक जबाबदारीचा खेळ आहे याचे भान आपण सर्वांनीच ठेवायला हवे.  – गौतम गंभीर, माजी क्रिकेटपटू

आपली प्रतिक्रिया द्या