पीक विमा, कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी

53

सामना प्रतिनिधी । मुंबई

शेतकऱयांचे पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱयांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. विमा अधिकारी आणि कृषी अधिकाऱयांकडून शेतकऱयांना योग्य न्याय मिळत नाही. शेतकरी कर्जमाफी आणि पीकविम्याचे पैसे शेतकऱयांना न मिळाल्यास त्यांचा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी दिला.

अर्थसंकल्प तसेच दुष्काळावरील चर्चेदरम्यान शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी शेतकऱयांचा पीकविम्याचा प्रश्न मांडला. पीकविम्याचे पैसे शेतकऱयांना अद्याप मिळालेले नाहीत. कागदपत्रांची कारणे देत शेतकऱयांना विमा नाकारला जात आहे. यामुळे शेतकऱयांच्या भावनांचा उद्रेक होईल, असे सुनील प्रभू म्हणाले.

कृत्रिम पाऊस पाडा
मुंबईत पिण्याच्या पाण्याची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात पाऊस पडत असला तरी मुंबईत अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाऊस पडत नसलेल्या भागात सरकारने कृत्रिम पावसाबाबत सरकारने निर्णय घेतला असल्यास तो योग्य आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची भयावह स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात असे ते म्हणाले.

  •  मुंबादेवी मंदिराचा तसेच शेजारील परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात यावा. येथे मुंबादेवी क्षेत्राला पर्यटनाचा दर्जा देण्यात येऊन त्याचा विकास झाल्यास येथे येणाऱया पर्यटकांना सोयीसुविधा निर्माण होतील. हा परिसर स्वच्छ सुंदर करण्यात येईल. यावेळी मुंबादेवीच्या विकास आराखडय़ासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
  •  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरावरून पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहते. हे पाणी येथील नद्यांना मिळते. मोठय़ा पावसात येथील झोपडपट्टय़ांमध्येही पाणी शिरते. त्यामुळे बंधारे घालून हे पाणी अडवण्यात यावे, जेणेकरून ते मानवी वस्तीतही शिरणार नाही. त्याचप्रमाणे बंधाऱयांचे योग्य नियोजन केल्यास हे पाणी जिरून त्याचा लाभ येथील नागरी निवारा वसाहत तसेच म्हाडा वसाहतींना होईल. येथील बोरिंग तसेच विहिरींना पाणी लागून पाण्याचा प्रश्न सुटेल. यासाठी पालिका अर्थसंकल्पातही चार कोटींची तरतूद करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना देण्यात आले होते, मात्र अद्याप तरतूद करण्यात आली नाही. तसे निर्देश आयुक्तांना द्यावेत. याविषयी आश्वासन देताना मुनगंटीवार यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासंदर्भात समिती नेमण्यात येईल. या समितीत सुनील प्रभू यांचाही समावेश करण्यात येईल, असे सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या