मस्ती अन् गुर्मीत राहू नका! 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण द्या! जरांगे यांचा फडणवीस सरकारला इशारा

राज्यातील नव्या सरकारचे अभिनंदन आहे. जनतेने दिलेल्या मतांचा आदर करून सरकारने आता रखडलेले प्रश्न सोडवले पाहिजेत. मस्ती अन् गुर्मीत राहू नका, तुमच्याकडे 5जानेवारीपर्यंतची मुदत आहे. या कालावधीत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे, नसता मराठे पुन्हा सर्व ताकदीनिशी आंदोलन करतील आणि ते सरकारला झेपणार नाही, अशा तिखट शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीस सरकारला डिवचले.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना मुलाखत देताना मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच मार्गी लावणार, असे म्हटले होते. मराठा आरक्षणासाठी काय काय केले, याचा पाढाही फडणवीस यांनी वाचला. त्याचाच संदर्भ घेत मनोज जरांगे यांनी आंतरवालीत पत्रकारांशी बोलताना पाच जानेवारीपर्यंत महिनाभराची मुदत आहे. मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे आदी प्रश्न सरकारने सोडवावेत. जनतेने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे. मराठा समाजाचाही त्यात मोलाचा वाटा आहे. आमचे प्रश्न मार्गी न लागल्यास पुन्हा प्रचंड आंदोलन उभे करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपोषणाचा मुहूर्त

राज्यात नवीन सरकार आल्यानंतर सामूहिक उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. आज त्यासंदर्भात माहिती देताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला की सामूहिक उपोषणाचा मुहूर्तही जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले.