माझ्या मुलाला घर द्याल का घर? जेईईत उच्च श्रेणी मिळालेल्या पालकांची आयआयटीकडे अजब मागणी

जेईई परीक्षेत उच्च श्रेणी मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पवई येथील आयआयटी मुंबईंकडे एक अजब मागणी केली. ‘माझ्या मुलाला आयआयटीच्या कॅम्पसमध्ये घर द्याल का? त्याला स्कॉलरशिप द्याल का?’ अशी मागणी आयआयटीच्या संचालकांकडे केली. पालकांची ही मागणी पाहून संचालक अवाक् झाले. उच्च श्रेणी सांगून तडजोडीचा प्रयत्न करत आहात का? असा सवाल करून, प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला इथे समान वागणूक दिली जाते असे संचालकांनी ट्विटरवरून स्पष्ट केले.

पवई आयआयटीचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली. ‘एका विद्यार्थ्याच्या आईने आयआयटीशी संपर्क साधला होता. जेईई-ऍडव्हान्स्ड परीक्षेत माझ्या मुलाला उच्च श्रेणी मिळाली आहे. त्यामुळे त्याला आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतर स्कॉलरशिप मिळेल का? आणि त्याला कॅम्पसमध्ये राहण्यास घर मिळेल का? असे त्या महिलेने विचारले.’ असे संचालकांनी ट्विटमध्ये नमूद केले. यासंदर्भात काय उत्तर दिले याचीही माहिती प्रा. चौधरी यांनी ट्विटरवरून दिली. ‘पालकांचे उत्पन्न कमी असेल तर विद्यार्थ्याला अर्ज केल्यानंतर स्कॉलरशिपसाठी त्याचा विचार केला जातो. पाच मुले असतील तर ती सर्वच समान नसतात, पण आईसाठी सर्व मुले सारखीच असतात. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबईतही सर्व विद्यार्थ्यांना समान अधिकार मिळतात. तिथे श्रेणी, उत्पन्न, संस्कृती किंवा सामाजिक स्थिती याचा विचार केला जात नाही.’ असे उत्तर संचालकांनी संबंधित पालकांना दिले.