संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी घरे द्यावीत

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी घरे देण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी आज केली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टय़ांचा प्रश्न माहितीच्या मुद्दय़ाद्वारे विधानसभेत उपस्थित केला. जवळजवळ 25 हजार झोपडपट्टीवासीयांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे घरे देणे आहे. मागच्या सरकारच्या काळात 2011 पर्यंत वास्तव्याच्या अधिकाराच्या नियमाप्रमाणे त्यांना घर देणे आहे. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्णय घेतला की, आजूबाजूच्या जमिनीवर घरे उभी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या कमिटीद्वारेही जमीन शोधण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या कमिटीने कोणत्या जमिनी शोधल्या आहेत?, किती दिवसांत जमिनी ताब्यात घेऊन सरकार या सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देणार आहे? जोपर्यंत आपण त्यांना कायमस्वरूपी घरे  देत नाही तोपर्यंत पाणी, वीज व शौचालय आणि रस्ते या नागरी सुविधांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.