मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या! शिवसेना

27

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शिवसेना खासदारांनी आज लोकसभेत आवाज उठवला. राज्य सरकारने मराठीला अभिजात दर्जा देण्याबाबतचे सर्व पुरावे केंद्राकडे सुपूर्द केले आहेत. त्याचा तातडीने विचार करून निर्णय घेण्याची मागणी केली.

केंद्र सरकारने तामीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या दाक्षिणात्य भाषांसह संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे; मात्र अद्यापही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच शून्य प्रहरात मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून लक्षवेधी मांडली तसेच अभिजात भाषेबाबतचे सर्व पुरावेही केंद्राला सादर केले असल्याचे बारणे यांनी मराठीतून भाषण करीत निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही मराठीतच बोलून लक्षवेधीला पाठिंबा दर्शविला. तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही सहकार्याचे आवाहन केले. काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही बारणे यांच्या मागणीला प्रतिसाद दिला. राज्य सरकारने प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या