हिंदुस्थानचा गोलंदाजी ताफा शानदार, ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राकडून कौतुक

583

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींची पावले ऑस्ट्रेलियाकडे वळावीत यासाठी टूरीझम ऑस्ट्रेलियाकडून पुढाकार घेण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर कांगारूंचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्रा मुंबईत आला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्याने हिंदुस्थानी गोलंदाजांचे कौतुक केले.

इशांत शर्माकडे अनुभव आहे. करिअर संपले असे वाटत असतानाच त्याने झोकात कमबॅक केले. जसप्रीत बुमराह आपल्या शॉर्ट रनअपने प्रतिस्पर्धी फलंदाजांचा थरकाप उडवतो. मोहम्मद शमीकडे वेग आहे. चेंडू स्वींग करण्याचे कसब त्याच्याकडे आहे, असे ग्रेन मॅग्रा यावेळी म्हणाला.

डे-नाईट कसोटीला ‘थम्स अप’
टी-20 क्रिकेटचा प्रसार व प्रचार वाढत चालला आहे. याचा विपरित परिणाम कसोटी क्रिकेटवर होऊ नये. यासाठी डे नाईट कसोटी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. माझा डे नाईट कसोटीला पाठिंबा आहे. डे नाईट कसोटीमुळे क्रिकेटप्रेमींची पावले याकडे वळतील. चार दिवसीय कसोटीचा मी फॅन नाहीए, असे सांगत ग्लेन मॅग्राने पारंपरिक क्रिकेटला महत्त्व दिले.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियामध्ये फायनल
या वर्षी अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कपची रंगत तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. यावेळी फायनलमध्ये कोणते दोन संघ येतील असे विचारले असता ग्लेन मॅग्रा म्हणाला, आत्ताच सांगणे कठीण आहे. पण सध्याचा फॉर्म पाहता हिंदुस्था -ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम लढत होईल. या दोन संघांसह पाकिस्तान व इंग्लंड हे दोन संघ अंतिम चारमध्ये येईल, असे ग्लेन मॅग्राला वाटते. तसेच सध्या सुरू असलेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमध्येही हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियात फायनल रंगताना पाहायला आवडेल, असेही तो म्हणाला.

– इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यामध्ये दोन वेळा टाय झाल्यानंतर अखेर सर्वाधिक चौकारांच्या निकषावर यजमान संघाला चॅम्पियन घोषित करण्यात आले. पण चौकारांच्या निकषावर अंतिम विजयी संघ ठरू नये.
– अ‍ॅण्ड्र्यू फ्लिंटॉफ, अ‍ॅण्ड्र्यू सायमंडस्, अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांसारख्या खेळाडूंमुळे क्षणार्धात लढतीचा निकाल बदलायचा. अष्टपैलू खेळाडू संघात असणे महत्त्वाचे ठरते.
– चेतेश्वर पुजारासारखा संयम असायला हवा. तो दिवसभर खेळपट्टीवर उभा राहिला. या दरम्यान त्याच्याकडून एकही धाव झाली नाही. त्यानंतरही तो शांत राहतो. त्याचे चित्त विचलीत होत नाही.
– हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियामधील आगामी कसोटी मालिका रंगतदार होईल. डेव्हिड वॉर्नर व स्टीवन स्मिथ या दोन प्रमुख फलंदाजांच्या कमबॅकमुळे हिंदुस्थानसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या