गोव्यात 157 रूग्णांची नोंद, वाढत्या संख्येमुळे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडे बोल

577

गोव्यात आज कोविडचे 157 रुग्ण सापडले. 143 जण बरे झाले असले तरी न्यू वाडे वास्को येथील 55 वर्षीय महिलेचे कोविड मुळे निधन झाल्याने मृतांचा आकडा 19 झाला आहे. आज राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना खडे बोल सुनावत कोविडचा फैलाव रोखण्यासाठी ज्या त्रुटी राहिल्या त्यावर लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला.

पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी तैनात पोलिस कर्मचाऱ्याला कोविडची लागण झाल्याने अग्निशामक दलाने मुख्यमंत्री निवासाचे सॅनिटायझेशन केले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे उद्या 17 जुलै पासून 3 दिवस लॉक डाउन करण्यात आले असून जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.उद्यापासून लॉक डाउन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकांनी खरेदीसाठी ठीकठिकाणी एकच गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शारीरिक दूरीचे निकष देखील पाळले जाताना दिसत नव्हते.

आतापर्यंत कोविडपासून सुरक्षित असलेल्या राजधानी पणजीतील रुग्ण संख्या आज 7 झाली आहे. ज्या मांगोर हिल मधून गोव्यात कोरोनाचा फैलाव झाला त्या मांगोर हिल मध्ये अजुन 69 रुग्ण आहेत.मांगोर हिलशी निगडीत रुग्ण 398 असून हा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसल्याने गंभीर परिस्थिती ओढवली आहे.

गोव्यात आतापर्यंत 3 हजार 108 रुग्ण सापडले आहेत. त्यातील 1 हजार 817 जण बरे झाले असून 1 हजार 272 जण अजुनही उपचार घेत आहेत. आज एका महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 19 झाला आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी रुग्ण आढळत आहेत. मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असलेल्या ठीकाणांमध्ये कुंकळळीत 25, लोटलीत 26, खांडोळ्यात 32, चिंबल मध्ये 104, नेरुल मध्ये 23, फोंडयात 45, पेडणेत 17, केपेत 24, शिरोडयात 20, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळीत 34, वेर्णा येथील ट्यूलिप डायग्नोस्टिक मध्ये 139, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपईत 21 आणि उसगावमध्ये 8, करासवाडा येथे 16, मडगाव येथे 17, मोती डोंगरावर 7, कुडतरी येथे 38 तर बाळळी येथे 42 रुग्ण आहेत.

मूरगाव तालुक्यात कोविडचा उद्रेक झाला आहे. सडा येथे 100, बायणा येथे 125, न्यू वाडे येथे 108, झुवारी नगर येथे 170, खारेवाडा येथे 104 रुग्ण असून बहुतेक मृत मूरगाव तालुक्यातील असल्याने तेथील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आज मृत झालेली महिला न्यू वाडे येथीलच होती. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देखील पूर्वीच वास्को मध्ये लॉक डाउन झाले असते तर ही परिस्थिती ओढवली नसती अशी टिपण्णी केली असल्याने सरकारला आता हा प्रश्न गंभीरपणे घ्यावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या