गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकांची घोषणा; 12 डिसेंबर रोजी मतदान

नियोजित वेळापत्रका प्रमाणे मार्च मध्ये कोविड मुळे होऊ न शकेलेली जिल्हा पंचायत निवडणूक आता 12 डिसेंबर रोजी होणार असून 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक मतपत्रिकांद्वारे होणार असून मतदानाच्या शेवटच्या तासात कोविड रुग्ण मतदान करू शकणार आहेत.

पक्षीय पातळीवर होणारी ही निवडणूक 2022 च्या विधानसभे पूर्वी राजकीय पक्षांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार असल्याने सत्ताधारी भाजपा बरोबर विरोधी पक्ष काँग्रेस, मगो, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

गोव्यात जिल्हा पंचायतीच्या उत्तर गोव्यात 25 आणि दक्षिण गोव्यात 25 मिळून एकूण 50 जागा आहेत. त्यातील दक्षिण गोव्यात मोडणाऱ्या सांखवाळ मतदार संघातून भाजपाच्या उमेदवार बिन विरोध निवडून आल्या असल्याने तेथे मतदान होणार नाही. त्याशिवाय दक्षिण गोव्यातीलच नावेली येथील एका उमेदवाराचे निधन झाल्याने तेथे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंतर निवडणूक घेतली जाणार आहे.त्यामुळे 12 रोजी उत्तर गोव्यातील 25 आणि दक्षिण गोव्यातील 23 मिळून फक्त 48 जागांसाठी मतदान होणार आहे.

निवडणुकीची घोषणा निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी आज केली. त्यामुळे आज पासून जिल्हा पंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.मतमोजणी 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असून मध्यरात्री 12 वाजे पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे.

12 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत मतदान होणार आहे. शारीरिक दूरी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. शेवटचा एका तास कोविड रुग्णांना मतदान करण्यासाठी ठेवला जाणार आहे. प्रचारापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आता कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या