Goa Nightclub Fire – गोव्याच्या नाईट क्लबमध्ये अग्नितांडव; 25 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

गोव्यामधील एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी (6 डिसेंबर 2025) रात्रीच्या सुमारास सिलेंडरचा भयंकर स्फोट झाला. यावेळी क्लबमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. अशातच स्फोट झाल्याने काहींचा मृत्यू हा आगीत होरपळून झाला, तर काही जण गुदमरून मृत्यूमुखी पडले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

India Today ने दिलेल्या वृत्तानुसार, गोव्यातील अरपोरा परिसरातील बर्च बाय रोमियो लेन क्लबमध्ये शनिवारी रात्री साधारण 12 च्या दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटाची भीषणता अत्यंत गंभीर होती. यामध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये 12 कर्मचारी आणि 4 पर्यटकांचा समावेश आहे. तर अन्य 7 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. यामध्ये तिघांचा मृत्यू हा आगीत होरपळून झाला आहे. तर बाकीच्यांच्या मृत्यू गुदरमरल्याने झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

गोव्याचे पोलीस महासंचालक (DGP) अलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जणांचे मृतदेह क्लबमधून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये जास्त करून क्लबच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आग तळमजल्यावरील स्वयंपाकघरात लागली आणि नंतर इतर भागात पसरली. त्यामुळे स्वयंपाकघरात जास्त मृतदेह आढळले, अशी माहिती अलोक कुमार यांनी दिली. तसेच न्यायवैद्यक (FSL) पथक आग लागण्यामागचं मुळ कारण शोधत आहे. अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले की नाही, हे तपासात निश्चित केले जाईल. तसेच याप्रकरणी घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीटरवर पोस्ट करत दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये देण्याची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.