भारत जोडो यात्रेचा परिणाम, 8 आमदार भाजपमध्ये गेले! चित्रपट दिग्दर्शकाचा काँग्रेसला टोमणा

गोव्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपने काँग्रेसचे 8 आमदार आपल्या बाजूने वळवण्याचे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरु केले होते. जुलै महिन्यात भाजपने हा प्रयत्न करून पाहिला होता मात्र त्यावेळी ऑपरेशन लोटस फसले होते. हे ऑपरेशन लोटस आज (14 सप्टेंबर 2022) यशस्वी झाले. काँग्रेसच्या 8 आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधीमंडळात भेट घेतली. यानंतर या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींबाबत बोलताना चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे काँग्रेसला टोमणा मारला आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ” #BharatJodoYatra चा परिणाम गोव्याचे 8 काँग्रेस आमदार ज्यात दिगंबर कामत, मायकल लोबो, देलिलाह लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, संकल्प अमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडीस हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जय हो!!

बुधवारी सकाळी गोव्यातील काँग्रेस पक्षाचे 8 आमदार गोवा विधानसभेत पोहोचले होते. या आमदारांची विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या दालनात बैठक झाली आणि नंतर हे सगळे आमदार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जाऊन भेटले होते. गोव्यातील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांचा भाजपमध्ये जाण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे. काँग्रेस आमदार फोडण्याचा पहिला प्रयत्न झाला तेव्हा त्यांना थांबवण्यात काँग्रेस नेत्यांना यश आलं होतं. गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे एकूण 11 आमदार निवडून आले होते, त्यातील 8 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. गोव्यामध्ये भाजपचे 25 आमदार आहेत.