गोवा- कस्टम विभागाकडून पाच कोटी रुपयांचा ड्रगसाठा नष्ट

501

गोव्याच्या कस्टम विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेला सुमारे पाच कोटी रूपये किमतीचा ड्रग्सचा साठा शुक्रवारी नष्ट केला. हे ड्रग्स कस्टम विभागाने व महसुल संचालनालयाने वेळोवेळी केलेल्या कारवाईत दाबोळी विमानतळ तसेच अन्य ठिकाणी जप्त केले होते.

गोवा कस्टम विभागाचे आयुक्त मिहीर रंजन व अमली पदार्थ विल्हेवाट समितीच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोवा कस्टम विभाग तसेच महसुल संचालनालय यांनी दाबोळी विमानतळ तसेच अन्य काही ठिकाणी केलेल्या कारवाई घन, द्रव्व व पावडर स्वरूपातील विविध प्रकारचे ड्रग्स जप्त केले होते. नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्समध्ये एक्स्टासीच्या 3549 गोळ्या, 960 ग्रॅम एमडीएमए, 40.7 लीटर केटामाईन द्रव्य, 53.62 किलो केटामाईन पूड, 9.3 किलो चरस व 4.995 किलो एफेड्रूीनचा समावेश होता.

या ड्रग्सच्या साठयाची किंमत जवळपास पाच कोटी रूपये होती. गोमेकॉच्या परिसरात हा साठा नष्ट करण्यात आला. गोमेकॉमध्ये असे पदार्थ नष्ट करण्याची सुविधा आहे. कस्टमचे सह आयुक्त प्रज्ञशील जुमले, कस्टमचे उपआयुक्त डॉ. राघवेंद्र पी. व सहाय्यक आयुक्त सुनिलकुमार यांचा समावेश असलेल्या समिती नियंत्रणाखाली हे ड्रग्सचे पदार्थ नष्ट करण्यात आला.

ड्रग्स नष्ट करण्यासाठी काल शुक्रवारी 11.30 वाजल्यापासून देशव्यापी मोहिम सुरू झालेली असून त्या मोहिमेअंतर्गंतच ही कारवाई करण्यात आली. ड्रग्स नष्ट करण्यासाठी गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे सहकार्य लाभले.

आपली प्रतिक्रिया द्या