
गुरुवारी म्हणजेच 20 जानेवारी रोजी भाजपने गोव्यातील उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. पणजीतून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या उत्पल पर्रीकरांचे तिकीट कापण्यात आल्याने ते नाराज झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र भाजपतील नाराजांची यादी इथेच संपलेली नाही. ही यादी वाढत चालली असून दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर ती आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा असून भाजपने गुरुवारी 34 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 6 नावे जाहीर करणे अद्याप बाकी आहे.
ही बातमी वाचलीत का? – 5 वर्षात 70 टक्के आमदारांनी पक्ष बदलला, गोव्याच्या नावावर अनोखा विक्रम
भाजपने पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उप मुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर, काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले जलस्त्रोत मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्स, उप सभापती इजिदोर फर्नांडिस, मगो सोडून भाजपमध्ये आलेले दीपक पाऊसकर यांची तिकीटे कापली आहेत. विश्वजीत राणे आणि बाबुश मोन्सेरात या दोघांसह त्यांच्या पत्नींनाही भाजपने उमेदवारी दिली असून या चौघांची नावे पहिल्या यादीत आहेत.
ही बातमी वाचलीत का? – गोवा भाजपात बंड! माजी मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांनी फडकवले निशाण
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि त्यांची बायको सावित्री कवळेकर हे दोघे सावित्री यांना सांगे विधानसभा मतदारसंघातून आग्रही होते. या मतदार संघातून सुभाष फळदेसाई यांना भाजपने तिकीट दिले आहे. भाजपने पहिल्या यादीत बाबू कवळेकर यांना उमेदवारी दिली मात्र त्यांच्या पत्नी सावित्री यांना उमेदवारी दिली नाही, यामुळे त्या नाराज झाल्या आहेत. सावित्री यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमधून राजीनामा देत बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यांनी सांगे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
ही बातमी वाचलीत का? – अमित पालेकर आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनादेखील उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. मांद्रे मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि त्यांचे समर्थक दुखावले असून पार्सेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रींगणात उतरावे असा आग्रह ते करत असल्याचे कळते आहे. कुंभारजुवे मतदारसंघातून केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. त्यांना उमेदवारी नाकारल्यास तेही भाजपविरोधात बंडाची भूमिका स्वीकारू शकतात असे सांगितले जात आहे.