निवडणूकपूर्व महाआघाडीचा मगोपकडून अपमान, गोवा सुरक्षा मंचची टीका

31

सामना ऑनलाईन, पणजी

गोवा सुरक्षा मंचने आज महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षावर (मगोप) जोरदार टीकास्त्र सोडले. गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी मगोपने भाजपशी हातमिळवणी करून निवडणूकपूर्व महाआघाडीचा घोर अपमान केला आहे, अशा कडक शब्दांत गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी मगोपवर टीका केली आहे.

गोव्यामधील शाळांमध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या मुद्यावर गोवा सुरक्षा मंच स्थापन केलेला आहे आणि हाच मुद्दा विधानसभा निवडणुकीत आम्ही उठविला. यामुळेच गोव्यात भाजप केवळ १३ जागा जिंकून दुसऱया क्रमांकावर आली असे आनंद शिरोडकर यांनी सांगितले. आता यापुढेही मातृभाषेतून शिक्षण देण्याचा मुद्दा आम्ही मागे घेणार नाही, असेही शिरोडकर यांनी स्पष्ट केले. भाजपविरोधात गोव्यात मगोप, शिवसेना, गोवा सुरक्षा मंच ही महाआघाडी स्थापन केली. या महाआघाडीने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे गोव्यात भाजपची पीछेहाट झाली. या महाआघाडीतील मगोपला तीन जागा मिळाल्या याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘मगोपशी आमची निवडणूकपूर्व आघाडी होती. आज मगोप सत्ता स्थापन्यासाठी भाजपसोबत जात आहे, हे अत्यंत दुःखद आहे आणि हा निवडणूकपूर्व आघाडीचा अपमान आहे. गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपला मतदारांनी एक नंबरवरून खाली आणलेले आहे. सत्ता स्थापनेसाठी जे पक्ष आज भाजपशी हातमिळवणी करीत आहेत ते मतदारांशी बेइमानी करीत आहेत’
– आनंद शिरोडकर, अध्यक्ष गोवा सुरक्षा मंच

 

आपली प्रतिक्रिया द्या