किनारपट्टी सुरक्षेचा गोवा, गणपतीपुळे पॅटर्न

41

सामना ऑनलाईन, मालवण

किनारपट्टीवर वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे समुद्री पर्यटनास येणाऱ्या पर्यटकांच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सुरक्षित सागरी पर्यटनासाठी आगामी काळात गोवा, गणपतीपुळे धर्तीवर सुरक्षा यंत्रणा राबवली जाईल. केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेचा काही निधी किनारपट्टीवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठीही खर्च केला जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथे बोलताना दिली.

दरम्यान, वायरी किनारपट्टीवर अपघात घडल्यानंतर रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी जी तत्परता स्थानिक मच्छीमार, लोकप्रतिनिधी व मालवण पालिकेने दाखवली ती तत्परता प्रशासकीय यंत्रणेत दिसून आली नाही. तत्पर सेवा पुरविण्यात यंत्रणा काहीशी कमी पडल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

चार दिवसांपूर्वी वायरी किनारपट्टीवर बेळगाव येथील ८ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या वायरी किनारपट्टीची खा. राऊत यांनी मंगळवारी (१८) पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळकर, शिवसेना संगमेश्वर सभापती रमाकांत म्हस्कर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रसाद मोरजकर, पं. स. सदस्य मधुरा चोपड़ेकर, नगरसेवक नितीन वाळके, पंकज सादये, बाबी जोगी, तुलशीदास मयेकर, अंजना सामंत, दीपा शिंदे, किसन मांजरेकर, रवी तळाशीलकर व अन्य उपास्थित होते.

गोवा, गणपतीपुळे पॅटर्न सिंधुदुर्गात
किनारपट्टी सुरक्षेचा गोवा व गणपतीपुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर राबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. अत्याधुनिक सुरक्षा साहित्य जीवरक्षकांना दिले जाणार आहे. किनाऱ्यावर स्पीड पेट्रोलिंगच्या माध्यमातून सुरक्षा पुरवली जाईल. याबाबत बुधवारी (१९) मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या