अमित शहांच्या सभेप्रकरणी न्यायालयाने विमानतळ प्राधिकरणाला झापले

16

सामना ऑनलाईन । पणजी

मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने अमित शहा यांना विशेष वागणूक दिली म्हणून विमानतळ प्राधिकरणाला झापले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या १ जुलैच्या सभेसाठी गोव्यातील दाबोळी विमानतळाची जागा देण्यात आली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. आज (बुधवारी) त्यावर सुनावणी झाली आणि न्या. जी. एस. पटेल आणि न्या. नुतन सरदेसाई यांनी विमानतळ प्राधिकरणाला फैलावर घेतले.

कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. विमानतळ परिसराची जागा सार्वजनिक सभेसाठी वापरण्यात आल्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या प्रकरणी कोणाला दोषी ठरवायचे आणि त्यांच्यावर काय कारवाई करायची या संदर्भात २१ ऑगस्टच्या सुनावणीत निर्णय घेऊ, असे न्यायालयाने सांगितले.

याआधी अॅडव्होकेट एरिस रॉड्रिग्ज यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने विमानतळ प्राधिकरणाला जाब विचारला. न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना प्राधिकरणाने अमित शहा यांची सभा अचानक झाली असे उत्तर दिले. मात्र सभेसाठी व्यासपीठ, लाल रंगाचे सोफे आदी तयारी अचानक कशी होईल? असा प्रश्न उपस्थित करुन न्यायालयाने विमानतळ प्राधिकरणाला फैलावर घेतले.

विमानळावर येणाऱ्या-जाणाऱ्यांची सभेमुळे गैरसोय झाली. प्रवाशांचे हाल झाले. दाबोळी विमानतळावर नौदलाची विमानं उतरतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या विमानतळाला बरेच महत्त्व आहे तरीही विमानतळावर सार्वजनिक सभेला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने सभा प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या