सुवर्णमहोत्सवी इफ्फीचे मराठी रंग

838

देवेंद्र वालावलकर

यंदाच्या सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) पाच मराठी चित्रपटांना स्थान मिळाले होते. त्यातील ‘माई घाट ः क्राइम नंबर 103/2005’ची अभिनेत्री उषा जाधव हिने प्रतिष्ठेचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटवून मराठीचा झेंडा अटकेपार फडकवला आहे.

यंदा इंडियन पॅनोरमामधील फीचर फिल्म विभागात दाखवण्यासाठी निवडलेल्या 26 फीचर फिल्ममध्ये तब्बल पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली होती.

इंडियन पॅनोरमाच्या फीचर फिल्म विभागात सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’, समीर संजय विध्वंस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’, अनंत नारायण महदेवन दिग्दर्शित ‘माई घाट ः क्राइम नंबर 103/2005’ तसेच आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो प्रेम’ या सिनेमांचा समावेश होता. त्याशिवाय नॉन फीचर फिल्म विभागात  गणेश शेलार दिग्दर्शित ‘गढुळ’ हा सिनेमा दाखवण्यात आला. त्याला प्रतिनिधींचा चांगला प्रतिसाद लाभला.

ब्लेझ हॅरिसन दिग्दर्शित आणि एस्टेल फियालॉन निर्मित ‘पार्टीकल्स’ या चित्रपटाने 50 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रतिष्ठेचा ‘सवकर्ण मयूर’ पुरस्कार पटकावला आहे. या महोत्सवाचा शुकवारी समारोप झाला. 40 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांचा या पुरस्कारात समान वाटा आहे. विशेष म्हणजे,‘माई घाटः क्राइम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तिरेखेसाठी उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एका आईने पुकारलेला लढा या चित्रपटात आहे. ‘रौप्य मयूर’, प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये प्रत्येकी असे  सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्काराचे स्करुप आहे.

‘जलिकट्टू’साठी लिजो जोस पेल्लिसेरी यांचा सन्मान

‘जलिकट्टू’ या चित्रपटासाठी  लिजो जोस पेल्लिसेरी यांनी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकाकला. या पुरस्काराचे स्वरूप ‘रौप्य मयूर’, प्रशस्तिपत्र आणि 15 लाख रुपये असे आहे. हा मल्याळम चित्रपट आहे. दुर्गम गावातील एक बैल गावातून पळून जातो आणि त्यातून हिंसा उद्भवते, असे या चित्रपटाचे कथानक आहे. ब्राझीलचा चित्रपट ‘मारीघेला’ या चित्रपटातील कार्लोस मारीघेलाच्या भूमिकेसाठी सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘बलून’ला विशेष ज्युरी पुरस्कार 

इफ्फी महोत्सवात यंदा विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या ‘बलून’ चित्रपटाने पटकावला. या तिबेटी चित्रपटातील भाषिक सौंदर्याचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. ‘रौप्य मयूर’, प्रशस्तिपत्र आणि 15 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्करूप आहे. पौगांडावस्थेतील मुलांचा प्रवास आणि त्यायोगे भौतिकशास्त्राच्या मदतीने पलीकडच्या जगाचा शोध घेण्याचा त्यांचा प्रवास याचे चित्रण या चित्रपटात आहे. संयत चित्रांकनासाठी या चित्रपटाचे परीक्षक मंडळाने कौतुक केले.

आपली प्रतिक्रिया द्या