‘गोव्यात जागोजागी अमली पदार्थ मिळतात’… भाजपच्या मंत्र्याच्या वक्तव्याने वाद, मुख्यमंत्री म्हणाले…

गोव्याचे कायदा मंत्री एलेक्सो सिकेरा एका वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. गोव्यात जागोजागी अमली पदार्थ विकले जात आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होत नाही, असे एलेक्सो सिकेरा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्याच सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या वक्तव्यावर आता पडदा टाकत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्लिप ऑफ टंग म्हटले आहे.

सनबर्न फेस्टिव्हल यंदा दक्षिण गोव्यामध्ये आयोजित केला आहे. हा फेस्टिव्हल ड्रग संस्कृतीला चालना देत असल्याची त्याच्यावर टीका होत असते. अशातच सिकेरा यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. आज ड्रग्स प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला सनबर्न फेस्टिव्हलची वाट किंवा औषधे (अमली पदार्थ) उपलब्ध करण्याची आवश्यकता नाही. आतापर्यंत दक्षिण गोव्यामध्ये महोत्सव आयोजित करण्यासाठी सनबर्न आयोजकांकडून अर्ज आलेला नाही आणि ही फक्त तेथील रहिवाशांची चिंता व्यक्त होती की तो इथे आयोजित केला जात आहे. एलेक्सो सेकेरा म्हणाले की, तुम्ही सर्व सनबर्न फेस्टिव्हल आणि ड्रग्सबाबत आरडाओरड करता आहात. कोलवामध्ये दरवर्षी तीन दिवसांसाठी एक उत्सव आयोजित केला जातो, मला विश्वास आहे तुमच्यातील काही लोक त्या फेस्टिव्हलमध्ये गेले असतील. तुम्ही मला सांगू शकता का तिथे कोणते ड्रग्स नाहीत? माझे म्हणणे आहे तिथे औषधे (अमली पदार्थ) मिळतात. मला खात्री आहे तिथे ही औषधे उपलब्ध असतात.

एलेक्सो सिकेरा पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, तुम्ही मला सांगा तुमच्या गावात ड्रग्स उपलब्ध नाहीत का? तेव्हा तुम्ही काय करणार? मी काय करतोय? काही नाही. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर विरोधकांनी त्यांना घेरले. गोवा फॉरवर्ड पार्टीने एका निवेदनात म्हटले की, काही मंत्री अजूनही खरे बोलत आहेत, जे संपूर्ण गोव्याला माहीत आहे. यातून गोवा पोलिसांचे अपयश दिसून येते ही वेगळी बाब आहे. जे कदाचित सर्वांच्या संगनमताने झाले असेल. तर यावर मुख्यमंत्री सावंत यांनी सिक्वेरा यांच्या वक्तव्यावर पडदा टाकत त्यांची स्लिप ऑफ टंग झाल्याचे म्हटले.