गोव्यातील आयएसएलचा थरार मुंबईच्या भिंतीवर, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भित्तीचित्राचे अनावरण

गोव्यामध्ये इंडियन सुपर लीग या हिंदुस्थानातील अव्वल समजल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगत आहे. या स्पर्धेतील मुंबई सिटी एफसीची घरच्या मैदानावरील लढत मंगळवारी पार पडली. पण त्याआधी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री व मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे (एमडीएफए) अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व चाहत्यांचे आभार मानण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीचित्राचे अनावरण केले. याप्रसंगी संघमालक रणबीर कपूर हाही उपस्थित होता.

आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, मुंबई सिटी एफसी हा आपल्या देशातील बलाढय़ अन् मोठा क्लब म्हणून ओळखला जातो. हा आपला संघ आहे. या संघाचे चाहते सदैव फुटबॉलपटूंच्या पाठीशी राहतील व जेतेपदासाठी प्रार्थना करतील यात शंका नाही. याप्रसंगी मुंबईकर व खेळाडूंच्या खेळभावनेच्या भित्तीचित्राचे अनावरण करताना मला आनंद होत आहे. या मोसमासाठी मुंबई सिटी एफसी संघाला माझ्या शुभेच्छा.

मुंबईतील तान्या ईडन हिने हे भित्तीचित्र तयार केले असून अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल तसेच गोव्यामध्ये ही भित्तीचित्र उभारण्यात आली आहेत. या भित्तीचित्रात खिलाडूवृत्ती, समर्पण व धैर्य यांचा मिलाफ दाखवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या