‘त्रिदश’ होण्यासाठी…

110

 << दिलीप जोशी  >>  << [email protected] >>

असं म्हटलं जातं की, परमेश्वर ‘त्रिदश’ आहे. बाल्य, किशोरावस्था आणि तारुण्य या ईश्वराच्या अवताराच्याही तीन दशा असतात. तो अमर आहे त्यामुळे त्याच्या जीवनात ‘वृद्धत्व’ ही ‘चतुर्दशा’ संभवत नाही. एरवी महाकवी गदिमांनी म्हटल्याप्रमाणे ‘जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात?’ जो जन्माला आला तो कधी ना कधी कालवश होणारच. हे जीवनसृष्टीविषयीचं सत्य कितीही कटू असलं तरी प्रत्येक सजीवाला ते पचवावंच लागतं.

विश्वातला प्रत्येक सजीव अधिकाधिक जगण्याची इच्छा धरतो. त्यासाठी धडपड करतो. सजीवांच्या शरीरातील प्रत्येक पेशी सजीव असते आणि कोटय़वधी पेशींच्या समुच्चयातून घडलेलं शरीर निसर्गाने बहाल केलेलं असतं. ते अबाधित राहावं यासाठी माणसासारख्या सजीवाचे तर अटोकाट प्रयत्न सुरू असतात. झाडं पानं, पक्षी-प्राणी, जलचर हीसुद्धा सजीव मंडळीच, पण काळक्रमानुसार कधी आधी, तर कधी नंतर म्हणजे काहीवेळा अकाली तर काही वेळा जीवनमान संपल्यावर काळाच्या आधीन होतात. माणूस मात्र आजारांवर ‘औषध’ शोधून आयुर्मान वाढविण्यात यशस्वी झाला आहे. गेल्या ५० वर्षांत जगातल्या माणसांचं सरासरी आयुर्मान वाढलं आहे. आता वाढत्या आयुर्मानाच्या वरदानातील शापाचं अस्तर म्हणजे म्हातारपण.

पंत कवींनी ‘कृतान्तकटकामलध्वज जरा दिसो लागली’ असं डोक्यावरच्या वृद्धत्वाने दिसणाऱया पांढऱया केसांचं वर्णन केलंय. परिस्थितीने गंजून ‘पकलेले’ बरेच असतात पण अगदी परिपक्व जीवनाचा उपभोग  घेणाऱयांनाही शेवटी वार्धक्य येतंच. ‘शतायुषी’ होण्याच्या शुभेच्छा फार कमी लोकांच्या बाबतीत सत्यात उतरतात. प्रबळ जीवनेच्छा आणि स्थितप्रज्ञता असलेली महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारखी माणसं एकशेपाच वर्षंही जीवन अनुभवतात. जपानमध्ये आणि मध्य पूर्वेत वय दीडशेच्या घरात गेलेली काही माणसंसुद्धा आहेत असं म्हणतात. त्यांच्या जन्मतारखेचे निश्चित पुरावे असतील तर आपला देह दीडशे वर्षांपर्यंत धडधाकट ठेवणे ही एक योगसाधनाच म्हणायला हवी.

असा देहयोग क्वचितच कुणाच्या वाटय़ाला येत असणार. एरवी आयुष्याचे भोग सहन करत साठीनंतर मेटाकुटीला आलेलेच जास्त आढळतील. ‘आता काय वय झालं’ असं कोणत्याही वयात वाटायला लागलं की माणूस मनाने म्हातारा होतो. तसं वाटत नाही तोपर्यंत शरीर म्हातारं होत चाललं तरी मनाचा उत्साह अमाप असतो. मात्र या मनाच्या उत्साहाला वार्धक्याचा अडसर केव्हा ना केव्हा सतावू लागतोच.

वाढत्या आयुर्मानामुळे वय वाढलं तरी तारुण्य ओसरू नये यासाठी प्राचीन काळापासून प्रयत्न सुरू आहेत. ‘अजून यौवनात मी’ अशी आस असणारे तारुण्य टिकविण्यासाठी, नानाविध उपाय, उपचार करत असतात. च्यवन ऋषींनी आवळय़ाच्या कल्पाद्वारे तारुण्य परत मिळविलं असं म्हटलं जातं. ययाती राजाने तर तारुण्याच्या  हव्यासापायी आपल्या मुलाचं म्हणजे पुरूचं  तारुण्य उसनं घेतल्याची विस्मयकथाही आहे. थोडक्यात काय तर आपण अजरामर नाही तरी ‘अजरा’ अवस्थेत अखेरपर्यंत राहावं ही आस अनेकांना तारुण्य टिकविण्याचे प्रयोग करायला भाग पाडते.

अमेरिकेत आणि जपानमध्ये ‘तारुण्य’ अबाधित राहण्यासाठी काम करता येईल यावर गेली अनेक वर्षे संशोधन सुरू आहे. मानवी शरीरातील पुनरुत्पादक पेशी मात्र वृद्ध होत नसल्याने पुढच्या पिढीकडे तारुण्याचा वारसा आपोआपच पोचवला जातो.

नव्या संशोधनातून ‘एजिंग’ किंवा म्हातारपण रोखण्यासाठी मदत झाली तर माणसं वय वाढलं तरी तरुण राहतील आणि माणसाचं एकूणच आयुर्मान तीस टक्क्यांनी वाढेल असा एक अंदाज आहे. मग ‘जीवेत शरदः शतम्ः’ म्हणजे शंभर शरद ऋतूंचा अनुभव घ्या अशा शुभेच्छा देताना, ‘शतम्’च्या जागी ‘सहस्रम’ म्हणावं लागेल.

तारुण्य टिकवून आयुर्मान वाढल्याने माणसाला आनंद नक्कीच होईल पण सध्याच्या उण्यापुऱया जास्तीत जास्त शंभर वर्षांच्या आयुष्यात ज्या समस्या येतात त्यांचा काळही वाढेल. आपलं जीवन अर्थपूर्ण कसं करायचं याचं गमक गवसलं नाही तर वाढत्या वयाचंही ओझं वाटू लागेल. शंभरीकडे झुकलेले अण्णासाहेब कर्वे म्हणाले होते की, माझ्या हातून समाजोपयोगी असं काही कार्य होणार असेल तर आणखी जगावंसं वाटेल.

अशी जीवनेच्छा असेल तर शंभरी पार करूनही खुशाल जगावं. योगायोगाने मिळालेलं मानवी जीवन सुंदर आहे. चिंता, आजार, व्यसनं यामुळे अनेकदा देहाची अकाली झीज होते. निरोगी मनाने जगता आलं तर वाढत्या आयुर्मानाचा अधिकाधिक आस्वाद घेता येईल. वय आणि तारुण्य वाढवता येईल कदाचित पण जीवनातला आनंद वाढविण्याचं ‘औषध’ आतूनच शोधावं लागेल. मग कविवर्य बोरकरांच्या शब्दात ‘जीवन त्यांना कळले हो’ असं म्हणता येईल. अन्यथा  उरेल तो दिवस, महिने, वर्षांचा खेळ.

 

आपली प्रतिक्रिया द्या