
गोदावरी नदीवरील मोठा पूल पाडण्यात येत असून गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाच्या घोटीव व घडीव दगडाचा वापर स्वामी समर्थ घाट, शुक्लेश्वर घाट व गाव वेश बांधण्यासाठी करून शहराचे सौंदर्य वाढवावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
मोठा पूल आठवडाभरात पूर्ण जमीनदोस्त होईल. संपूर्णपणे दगडी बांधकामात करण्यात आलेला हा पूल होता. या पुलावरील एकाही दगडाची आजतागायत कपचीही उडालेली नाही. हे चिरेबंदी करोडो रुपयाचे घोटीव व घडीव दगड नगरपालिकेने घेऊन गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर स्वामी समर्थ मंदिरालगत समर्थ घाट, तर दक्षिण तीरावर शुक्लेश्वर घाट व कोपरगावची मुख्य गाव वेश त्या दगडांनी बांधून कोपरगाव शहराचे सौंदर्य खुलवावे, जेणेकरून पुलाच्या खुणा पुसल्यानंतरही 72 वर्षांपूर्वीच्या या पुलाच्या वास्तू शिल्पाचा उत्कृष्ट नमुना यामुळे कोपरगावकरांच्या चिरंतन आठवणीत राहील.
दक्षिण वाहिनी गोदावरीमुळे कोपरगावला दक्षिणकाशी संबोधले जाते. या ठिकाणी सिंहस्थ काळात ग्रहण व पर्वणी काळात स्नानाचे मोठे महत्त्व आहे. गोदावरी नदीच्या तीरावर रामेश्वर मंदिर, दत्तपार, स्वामी समर्थ मंदिर शुक्लेश्वर मंदिर मंदिर, कचेश्वर मंदिर, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिर, जंगली महाराज आश्रम, कोकमठाणचे रामदासी महाराज संवत्सरचे शृंगऋषी मंदिर, विभांडक ऋषी आश्रम, महानुभाव पंथीयांचे श्रीकृष्ण मंदिर आदी ठिकाणी अनेक ऐतिहासिक पौराणिक मंदिरे आहेत. बाहेरगावचे लोक दर्शनाला, स्नानाची पर्वणी साधण्यासाठी आले असता हा दगडांचा स्वामी समर्थ घाट व शुक्लेश्वर घाट नदीकाठी निश्चितपणे शोभून दिसेल, या घोटीव दगडी कामात गावची वेश बांधल्यास गावाचा भारदस्तपणा आणि वेशीची भव्यता ही वाढेल.
पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे होते. हे कठडे चौकोनी दगडांमध्ये खूप छान घडवलेले होते तसेच खालच्या पायासाठी व बाजूच्या भिंतींच्या मजबुतीकरण म्हणून ही एका बाजूने सर्व दगड घडवलेले होते. आज पूल पाडण्यात येत असल्यामुळे पुलाचे मौल्यवान असे घोटीव व घडीव दगड मातीमोल होत आहे. यासाठी नगरपालिकेने संबंधित ठेकेदारामार्फत शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा, असे मौल्यवान घडवलेले दगड मिळावेत, अशी श्री पाटील यांनी मागणी केली आहे.
मागणीचा विचार करावा
मोठ्या पुलाचे घोटी व घडीव दगड तसेच जुना छोटा पूल होता. त्याचेही मोठमोठे फरशीवजा दगड आजही नदीत पात्रात तसेच पडलेले आहेत. श्रमदानातून ते सर्व एका ठिकाणी गोळा करून पंढरपूर येथे चंद्रभागा नदीत केलेल्या चौफुल्याप्रमाणे या दगडांचा वापर होऊ शकतो. त्याचीही पाहणी करून त्याप्रमाणे प्लॅन करता येऊ शकेल. तेव्हा तातडीने या मागणीचा विचार व्हावा.
– मंगेश पाटील, माजी नगराध्यक्ष