संगमनेर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच

संगमनेर शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून, गुरुवारी सायंकाळी चार दरोडेखोरांच्या टोळीने व्यापाऱयाच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने साडेनऊ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि अडीच लाखांची रोकड लंपास केली आहे. शहरातून जाणाऱया पुणे – नाशिक महामार्गावरील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सह्याद्री विद्यालयालगत ही घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शोभना केदारनाथ भंडारी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पुणे – नाशिक महामार्गालगत केदारनाथ भंडारी यांचे विविध व्यवसाय व निवासस्थान आहे. गुरुवारी सायंकाळी आठ वाजता चार दरोडेखोर भंडारी यांच्या घरात घुसले. यावेळी त्यांच्या पत्नी शोभना, मुलगा पार्थ आणि त्याचा मित्र प्रणव हे तिघेच घरी होते. दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून पिस्तूल, चाकू व कोयत्याचा धाक दाखवत तिघांना मारहाण केली. त्यांना हत्यारांचा धाक दाखवून कपाटात ठेवलेली दोन लाख साठ हजारांची रक्कम, साडेनऊ तोळ्यांचे दागिने आणि विवो कंपनीचा मोबाईल घेऊन पोबारा केला.

या घटनेनंतर घाबरलेल्या भंडारी कुटुंबीयांनी पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरोडेखोरांचा शोध घेतला; मात्र त्यांना सुगावा लागला नाही. मध्यरात्री शोभना भंडारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभारीराज’मुळे पोलिसांचा धाक संपला

संगमनेर शहरासह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. दोनच दिवसांपूर्वी गोल्डन सिटी, अरगडे मळा, गुंजाळवाडी शिवार, हॉटेल स्वदेश या परिसरात चोरटय़ांनी घरे फोडली होती. ते दरोडेखोर तेथील सीसीटीव्हीत कैद झाले होते. मात्र, त्यांचा अद्यापि तपास लागलेला नाही. या घटनांनी संगमनेरकर भीतीच्या छायेखाली आहेत. संगमनेरमध्ये पोलीस खात्याचे प्रभारीराज सुरू आहे. परिणामी गुन्हेगारी वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एखाद्या कार्यक्षम अधिकाऱयाची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी संगमनेरकरांमधून होत आहे.