
नगर अर्बन बँकेच्या तीन शाखा, नगर शहर सहकारी बँक, रायसोनी मल्टिस्टेट, नागेबाबा मल्टिस्टेट आणि संगमनेरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेपाठोपाठ जिह्यातील आणखी एका बँकेतील बनावट सोनेतारण घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट सोने ठेवून तब्बल चार कोटी 20 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार दी नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (नामको) संगमनेर शाखेत समोर आला आहे. याप्रकरणी बँकेचा व्यवस्थापक, गोल्ड व्हॅल्युअरसह तब्बल 136 खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेत 69 लाखांचा बनावट सोनेतारण घोटाळा उघडकीला आला होता. त्यावेळी 32 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील गोल्ड व्हॅल्युअर आणि कर्जदारांना जामीन मिळाल्यानंतर आता ‘नामको’ बँकेतील बनावट सोनेतारण घोटाळाही उजेडात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक घोटाळ्यातील गोल्ड व्हॅल्युअरसह काही कर्जदारांचा या घोटाळ्यातही समावेश आहे. आरोपींनी संगनमत करत बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
‘नामको’ बँकेतील तब्बल 136 खातेदारांनी बनावट सोने बँकेत ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. या गैरव्यवहाराची रक्कम तब्बल 4 कोटी 20 लाख 15 हजार 807 रुपये आहे. बनावट सोने तारण ठेवत मोठय़ा प्रमाणात कर्ज उचलणाऱयांमध्ये संगमनेरसह अकोले, नाशिक, पुणे आदी ठिकाणच्या कर्जदार आरोपींचा समावेश आहे.
शाखाअधिकारी नीलेश वसंत नाळेगांवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 136 आरोपींविरोधात फसवणुकीसह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सव्वाचार कोटींच्या या गुह्याचा तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहेत. हा गुन्हा नगरच्या आर्थिक शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.