
अमेरिकेमधील बँका एकामागून एक डबघाईला जात असल्याने जागतिक शेअर बाजारात अस्थिरता आहे. त्याचा परिणाम देशातील शेअर बाजारावरही झाला आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली. शेअर बाजाराचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावरही होत असतो. बाजारात अस्थिरता असल्यास गुंतवणूकदार सोन्या-चांदीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढतात. आता सध्या शेअर बाजारात अस्थिरता असल्याने सोन्या-चांदीत गुंतवणूक वाढल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.
अस्थिर आर्थिक वातावरणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढू लागली आहे. शनिवारी सोने व चांदीत एकाच दिवसात प्रत्येकी 1,300 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले आहे. सोन्याचा आतापर्यंतचा हा उच्चांकी भाव आहे. सोने 7 ऑगस्ट 2020 रोजी 57,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. 26 जानेवारी 2023रोजी 57,950 रुपये होते. आता सोने प्रती 10 ग्रॅमसाठी 60 हजारावर गेले आहे. शेअर बाजारात अस्थिरता कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोने 70 ते 72 हजार रुपयांपर्यंत पोहचेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.