अमेरिका आणि इराणमधील तणावाचा सोन्याच्या दरवाढीशी काय संबंध आहे?

2086
gold

कासिम सुलेमानी नावाच्या इराणच्या बड्या लष्करी अधिकाऱ्याची अमेरिकेने इराकमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात हत्या केली आहे. इराण यामुळे भडकला असून त्यांनी बुधवारी इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले आहेत. इराकमधील माध्यमांनी दावा केला आहे की या हल्ल्यात अमेरिकेचे 80 सैनिक ठार मारले गेले आहेत. या दोन्ही देशांमधला संघर्ष वाढत चालला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद इतर देशांवरही पडायला सुरुवात झाली आहे. हिंदुस्थानात या संघर्षामुळे सोन्याचे दर वाढायला लागले आहेत.

जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात संघर्ष निर्माण झाल्यानंतर हिंदुस्थानात सोन्याचे दर का वाढतात असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. खरं पाहिल्यास हे दर फक्त हिंदुस्थानातच वाढतात असे नाही तर ते इतर देशातही वाढायला लागलेले असतात. तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सामान्य नागरिक मौल्यवान धातूंकडे पाहात असतो. यामध्ये सोनं आणि चांदी यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

इराण आणि अमेरिकेत जेव्हापासून संघर्ष सुरू झाला आहे तेव्हापासून हिंदुस्थानात सोन्या-चांदीचे दर वाढायला लागलेले आहेत. बुधवारी देखील दरवाढ कायम असल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी वायदा बाजारामध्ये सोन्याचा दर हा 41, 278 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका पाहायला मिळाला. तर चांदीचा दर प्रतिकिलो 48,778 रुपये इतका असल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या